पुणे आणि पिंपरी-चिंचवड परिसरातील कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये अकरावीच्या प्रवेशासाठी ऑनलाइन प्रवेश प्रक्रिया राबवण्यात येत आहे. या प्रवेश प्रक्रियेच्या दुसऱ्या विशेष फेरीत ६ हजार ७३७ विद्यार्थ्यांना प्रवेश जाहीर झाला असून, ४ हजार २८५ विद्यार्थ्यांना पहिल्या पसंतीचे महाविद्यालय मिळाले.
केंद्रीय अकरावी ऑनलाइन प्रवेश समितीतर्फे ऑनलाइन प्रवेश प्रक्रिया राबवण्यात येत आहे. यंदा कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये १ लाख १० हजार ९९० जागा प्रवेशासाठी उपलब्ध आहेत. त्यापैकी ९३ हजार ९६० जागा केंद्रीय ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेद्वारे भरल्या जाणार आहेत. प्रवेश प्रक्रियेत आतापर्यंत तीन नियमित फेऱ्या आणि एका विशेष फेरीद्वारे विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यात आले. तर अद्याप प्रवेश न घेतलेले विद्यार्थी, पुरवणी परीक्षेतील उत्तीर्ण विद्यार्थी आणि एटीकेटी सवलत प्राप्त विद्यार्थ्यांना प्रवेशाची संधी मिळण्यासाठी दुसरी विशेष फेरी राबवण्याचा निर्णय घेण्यात आला.

हेही वाचा >>> पुणे :चांदणी चौकातील जुना पूल पाडण्यास आणखी आठ दिवस विलंब? ; सेवावाहिन्या स्थलांतर रखडले

दुसऱ्या विशेष फेरीची गुणवत्ता यादी आणि महाविद्यालय प्रवेश गुरुवारी जाहीर करण्यात आले. दुसऱ्या विशेष फेरीत ९ हजार ४१५ विद्यार्थी सहभागी झाले. त्यातील ६ हजार ७३७ विद्यार्थ्यांना प्रवेश जाहीर झाला, तर २ हजार ६७८ विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यात आला नाही. प्रवेश जाहीर झालेल्यांपैकी ४ हजार २८५ विद्यार्थ्यांना पहिल्या पसंतीचे, १ हजार १३४ विद्यार्थ्यांना दुसऱ्या पसंतीचे, ५०४ विद्यार्थ्यांना तिसऱ्या पसंतीचे महाविद्यालय मिळाले.

Story img Loader