पुणे : कर्नाटकातून गांजा विक्रीसाठी आलेल्या एकाला गुन्हे शाखेच्या अमली पदार्थ विरोधी पथकाने शंकरशेठ रस्त्यावर पकडले.त त्याच्याकडून १२ लाख रुपयांचा ६० किलो गांजा जप्त करण्यात आला.

नदीम मोईज शेख (वय २८, रा. बिदर, कर्नाटक) असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे. शेख फॅब्रीकेशनचे काम करतो. त्याच्याविरुद्ध अमली पदार्थ विक्री प्रकरणी स्वारगेट पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्हे शाखेच्या अमली पदार्थ विरोधी पथकातील अधिकारी, कर्मचारी शंकरशेठ रस्त्यावर गस्त घालत होते. त्या वेळी सेव्हन लव्हज चौकात (झोले पाटील चौक) एक जण मोटारीत थांबला असून, त्याच्याकडे गांजा असल्याची माहिती तपास पथकाला मिळाली. त्यानंतर पोलिसांच्या पथकाने मोटार अडवली आणि तपासणी केली. मोटारीत पोत्यात गांजा भरुन ठेवल्याचे उघडकीस आले. त्यानंतर पोलिसांच्या पथकाने मोटारीसह ६० किलो गांजा असा १७ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.

गुन्हे शाखेचे पोलीस उपायुक्त निखील पिंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली अमली पदार्थ विरोधी पथकाचे पोलीस निरीक्षक उल्हास कदम, सहायक निरीक्षक अनिकेत पोटे, उपनिरीक्षक दिगंबर कोकाटे, हवालदार सुजीत वाडेकर, सचिन माळवे, संदीप शिर्के यांनी ही कामगिरी केली.