लोकसत्ता प्रतिनिधी
पुणे: खडकवासला साखळी प्रकल्पातून निघणाऱ्या मुठा डाव्या कालव्यातून शहरीकरणामुळे पाणी सोडणे बंद करण्यात आले आहे. परिणामी या कालव्यावरील सुमारे २० किलोमीटरचा रस्ता महापालिकेला भाडेतत्त्वावर देण्यात आला आहे. त्याला १२ वर्षांचा कालावधी उलटला आहे. भाड्यापोटीची रक्कम आतापर्यत सुमारे ६० लाख रुपये झाली आहे. मात्र, अजूनही थकीत असलेली रक्कम महापालिका प्रशासनाने जलसंपदाला दिलेली नाही. याबाबत जलसंपदाने अनेकवेळा स्मरणपत्रे पाठविली आहेत. मात्र, त्याला कोणताही प्रतिसाद महापालिकेकडून मिळाला नसल्याचे जलसंपदा विभागाकडून सांगण्यात आले.
आणखी वाचा- पुणे: कचरामुक्त गाव मोहिमेंतर्गत १२५ टन कचऱ्याचे संकलन
खडकवासला धरणसाखळी प्रकल्पातून निघणारा जुना मुठा कालवा हा न्यू कोपरे, कोंढवे-धावडे, शिवणे, वारजे, हिंगणे, कोथरूड, एरंडवणे, शिवाजीनगर, बोपोडी, औंध या भागातून जातो. हा कालवा २८ कि.मी. लांबीचा आहे, तर सुमारे ६५०० हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली होते. मात्र, या कालव्याच्या आसपास मोठ्या प्रमाणावर नागरीकरण झाले. त्यामुळे या कालव्यातून पाणी सोडणे बंद करण्यात आले आहे. पिण्यासाठी कालव्यातील नऊ कि.मीपर्यंत पुणेकरांना पिण्यासाठी जलवाहिनी टाकण्यात आली आहे. कालव्यातून पाणी सोडणे अनेक वर्षापासून बंद करण्यात आले आहे. त्यामुळे जलसंपदाने या कालव्यावरील सुमारे २० कि.मीचा रस्ता महापालिकेला सन २०१२ मध्ये भाडेतत्त्वावर वापरण्यास दिला. रस्ता भाडेतत्त्वावर देताना एका किलोमीटरला वर्षाकाठी नऊ हजार रुपये भाडे ठरविण्यात आले होते. तसा भाडेकरारनामा दोन्ही यंत्रणांनी केला होता. या कराराला १२ वर्षे उलटली असून भाड्यापोटी ६० लाख रुपये महापालिका प्रशासनाकडे थकीत आहेत. याबाबत जलसंपदा प्रशासनाने अनेकदा थकीत भाडे देण्यासाठी महापालिका प्रशासनाला स्मरणपत्रे पाठविली, मात्र त्यास कोणतेही उत्तर आलेले नाही, असे जलसंपदा विभागाकडून सांगण्यात आले.