ताथवडे गावच्या विकास आराखडय़ावरून शिवसेना व सत्तारूढ राष्ट्रवादीत आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी सुरूच असल्याने हा विषय चिघळू लागला आहे. १७४ कोटी रुपये किमतीच्या जागांचे आरक्षण बदलताना राष्ट्रवादी नेत्यांनी कोटय़वधींची माया गोळा केल्याचा आरोप शिवसेनेने केला. मात्र, योग्य त्या शिफारशी स्वीकारून केलेल्या बदलांमुळे तब्बल ६०० घरे वाचल्याचा दावा करत शिवसेनेतील गटबाजीत आम्हाला ओढून नियोजन समितीवर नाहक आरोप होत असल्याचे राष्ट्रवादीने म्हटले आहे.
नियोजन समितीचे सदस्य नवनाथ जगताप व सुनीता वाघेरे यांनी पत्रकार परिषदेत नियोजन समितीची बाजू मांडली. तिसऱ्या सदस्या माया बारणे घरगुती कार्यक्रमामुळे हजर नव्हत्या. ताथवडय़ाच्या आराखडय़ात नियोजन समितीने बिल्डरधार्जिन्या शिफारशी स्वीकारल्या, फेरबदल करताना कोटय़वधींचा घोळ घातल्याचा शिवसेनेचा आरोप सदस्यांनी फेटाळला. शिवसेनेत दोन गट आहेत, त्यांच्यातील भांडणात आम्हाला ओढण्यात आले आहे. योग्य त्या व कायद्यात बसणाऱ्या हरकती आम्ही स्वीकारल्या, शिवसेनेकडून आलेल्या हरकतींचाही त्यात समावेश होता. आराखडय़ात गैरव्यवहार झाल्याचा शिवसेनेतील एका गटाला अचानक साक्षात्कार झाला, इतके दिवस ते काय झोपले होते का? रस्त्यात जाणारी ६०० घरे आम्ही वाचवली. मात्र, आम्ही घेतलेल्या भूमिकेमुळे काहींची डाळ शिजली नाही. नगररचना उपसंचालक प्रतिभा भदाणे यांनी आरक्षण बदलासाठी एकरी भाव फोडल्याची तक्रार आम्ही सदस्यांनी केली होती, त्याचा सूड म्हणून शिवसेनेच्या एका गटाला हाताशी धरून भदाणे यांनी नियोजन समितीला बदनाम करण्याचा प्रयत्न केला आहे. त्यांनीच शिवसेनेचे पत्रक लिहून दिले. मोघम आरोप करण्याऐवजी पुरावे द्यावेत, असे आव्हान त्यांनी दिले.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा