पुणे : पुणे महापालिकेच्या माध्यमातून राबविण्यात येत असलेल्या पंतप्रधान आवास योजनेच्या दुसऱ्या टप्प्यासाठी आतापर्यंत महापालिकेकडे ६ हजार ३९४ नागरिकांचे अर्ज आले आहेत. या योजनेद्वारे धानोरी, बाणेर, कोंढवा, हडपसर, बालेवाडी तसेच वडगाव खुर्द या भागांत घरे बांधली जाणार आहेत.

शहरात राहणाऱ्या प्रत्येक नागरिकाला हक्काचे घर मिळावे, या उद्देशाने केंद्र सरकारच्या वतीने पंतप्रधान आवास योजना राबविली जात आहे. महापालिकेच्या माध्यमातून या योजनेंतर्गत २ हजार ९१८ घरे बांधून त्याचे वितरण करण्यात आले आहे. आता या योजनेचा दुसरा टप्पा महापालिकेने सुरू केला असून, यासाठी लाभार्थ्यांकडून अर्ज मागविण्यात आले आहेत. दुसऱ्या टप्प्यात ४ हजार १७६ घरे बांधण्याचे नियोजन महापालिकेने केले आहे. आर्थिक दुर्बल घटकातील नागरिकांना कमी खर्चात हक्काचे घर मिळावे, हा उद्देश या योजनेचा आहे.

या योजनेच्या दुसऱ्या टप्प्याची घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सप्टेंबर २०२४ मध्ये केली. त्यानंतर राज्य सरकारने आदेश काढून या योजनेसाठी नागरिकांची घरांसाठी नोंदणी करून घेण्याची सूचना महापालिकेला केली. मात्र, त्या वेळी विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता सुरू झाल्याने ही प्रक्रिया रखडली होती. महापालिकेने या योजनेसाठी नागरिकांकडून अर्ज मागविण्यास सुरुवात केली असून, ही नोंदणी ऑनलाइन पद्धतीने करता येणार आहे. दुसऱ्या टप्प्यात सहा भागांत ही घरे बांधली जाणार आहेत.

या योजनेसाठी ४ हजार १७६ घरे बांधण्यासाठी महापालिकेला ३०० कोटी रुपये खर्च येणार आहे. या योजनेतून ३०० चौरस फुटांचे घर मिळणार आहे. या योजनेसाठी पालिकेकडे आतापर्यंत ६ हजार ३९४ जणांचे अर्ज आले आहेत. या योजनेच्या माध्यमातून घरे घेण्यासाठी अधिकाधिक नागरिकांनी अर्ज करावेत, असे आवाहन महापालिकेच्या वतीने करण्यात आले आहे.