पुणे : शिक्षण हक्क कायद्यांतर्गत (आरटीई) खासगी शाळांतील २५ टक्के राखीव जागांवरील प्रवेश प्रक्रियेत सोडतीद्वारे प्रवेश जाहीर झालेल्या विद्यार्थ्यांच्या प्रवेशाची मुदत संपुष्टात आली. त्यानुसार, सोमवारी रात्रीपर्यंत ६४ हजार ४८८ विद्यार्थ्यांचे प्रवेश निश्चित झाले होते. आता उर्वरित जागांवर प्रतीक्षा यादीतील विद्यार्थ्यांना संधी दिली जाणार आहे.
प्राथमिक शिक्षण संचालनालयातर्फे आरटीई प्रवेश प्रक्रिया राबवण्यात येत आहे. यंदा राज्यातील ८ हजार ८६३ शाळांमध्ये १ लाख ९ हजार ८७ जागा प्रवेशासाठी उपलब्ध आहेत. त्यासाठी ३ लाख ५ हजार १५२ अर्ज आले होते. प्रवेशासाठी काढलेल्या सोडतीद्वारे १ लाख १ हजार ९६७ विद्यार्थ्यांना प्रवेश जाहीर झाला. त्यानंतर प्रवेशपात्र विद्यार्थ्यांसाठी प्रवेशफेरी सुरू करण्यात आली. मात्र, त्याला फारसा प्रतिसाद न मिळाल्याने १० मार्चपर्यंत मुदतवाढ देण्यात आली होती. या मुदतीत ६४ हजार ४८८ विद्यार्थ्यांनी प्रवेश निश्चित केला आहे.
प्राथमिक शिक्षण संचालक शरद गोसावी म्हणाले, ‘आरटीई प्रवेश प्रक्रियेत सोडतीद्वारे प्रवेश मिळालेल्या विद्यार्थ्यांच्या प्रवेशासाठी पुरेसा वेळ देण्यात आला. त्यामुळे आणखी मुदतवाढ न देण्याचा निर्णय घेण्यात आला. आता उर्वरित जागांवर प्रतीक्षा यादीतील विद्यार्थ्यांना प्रवेशाची संधी दिली जाणार आहे. त्यासाठी स्वतंत्रपणे माहिती दिली जाईल.’
दरम्यान, आरटीई संकेतस्थळावरील सोमवारी रात्रीपर्यंतच्या आकडेवारीनुसार, पुणे जिल्ह्यात सर्वाधिक ११ हजार ११४ विद्यार्थ्यांनी प्रवेश निश्चित केला. त्या खालोखाल ठाणे जिल्ह्यात ६ हजार ५४८, नागपूर जिल्ह्यात ३ हजार ३६५, नाशिक जिल्ह्यात ३ हजार २३९, छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात २ हजार ३३६, अहिल्यानगर जिल्ह्यात २ हजार ३१९ विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला.