काही वर्षांपासून विभक्त राहणाऱ्यांचे संसार जुळले.. अनेक वर्षांपासून न्यायालयाचे खेटे मारणाऱ्यांना दिलासा मिळाला.. अनेक पीडितांच्या कुटुंबांना नुकसान भरपाई मिळाली.. अनेक जण गुन्हेमुक्त झाले.. ही किमया साधली ती राष्ट्रीय महा लोकअदालतीमध्ये. देशभरातील सर्व न्यायालयात एकाचवेळी आयोजित करण्यात आलेल्या राष्ट्रीय महा लोकअदालतीमध्ये पुणे जिल्ह्य़ात तब्बल ६४ हजार २१६ प्रकरणे तडजोडीने मिटविण्यात आली. त्या वेळी अनेक पक्षकारांच्या चेहऱ्यावर समाधान पाहायला मिळत होते.
पुणे जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या वतीने शनिवारी सकाळी शिवाजीनगर न्यायालयात राष्ट्रीय महा लोकअदालतीचे एका पक्षाकाराच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. या वेळी मुख्य जिल्हा न्यायाधीश अनंत बदर,  जिल्हा न्यायाधीश एस. डी. दरणे, प्राधिकरणाचे सचिव आर. के. मलाबदे, पुणे बारचे अध्यक्ष राजेंद्र उमाप, अ‍ॅड. अतिश लांडगे, सर्व न्यायाधीश उपस्थित होते. सकाळपासून पक्षकारांनी मोठी गर्दी केली होती. या महा लोकअदालतीमध्ये पुणे जिल्ह्य़ात तब्बल एक लाख ३४ हजार खटले तडजोडीसाठी ठेवण्यात आले होते. त्यामध्ये ६४ हजार २१६ एवढे खटले निकाली काढण्यात आले. चार वर्षांपूर्वी किरकोळ कारणावरून विभक्त झालेले भोसरी येथील एक दाम्पत्य आज या महा लोकअदालतीमुळे पुन्हा एकत्र नांदलला लागले. तर, लग्नानंतर चार महिन्यातच विभक्त झालेल्या दाम्पत्याने वेळ न घालवता याठिकाणीच लग्न रद्द करून दोघांनी वेगळा मार्ग धरला.
विमा कंपनीने दिला चार लाखांचा धनादेश!
सनजी श्रीनिवासन यांनी बजाज अलायन्स कंपनीकडून ओव्हरसिज ट्रॅव्हल्स इन्शुरन्सची विमा पॉलिसी घेतली होती. ते मलेशियाला पर्यटनास गेले असता त्यांना अचानक छातीमध्ये त्रास सुरु झाला. त्यामुळे मलेशियामध्ये उपचार करावे लागले. त्यासाठी त्यांना चार लाख रुपये खर्च आला. हा परतावा मिळावा म्हणून त्यांनी ग्राहक मंचाकडे तक्रार केली होती. मंचासमोर तक्रारदार आणि कंपनी यांच्यात मार्ग काढण्यासाठी चर्चा झाली. हे प्रकरण महालोकअदालतीमध्ये ठेवण्यात आले. त्यानुसार कंपनीने तक्रारदाराला चार लाख रुपयांचा धनादेश दिला. कंपनीच्यावतीने अ‍ॅड. हृषीकेश गानू यांनी काम पाहिले.
अपघातांच्या प्रकरणांत सात कोटींची भरपाई
मोटर अपघात नुकसान भरपाईची साडेतीनशे प्रकरणे तडजोडीसाठी महालोअदालतीमध्ये ठेवली होती. त्यापैकी १७१ प्रकरणांमध्ये तडजोड करून पीडितांना सात कोटी सहा लाख रुपयांची नुकसान भरपाई देण्यात आली. यामध्ये एसटी महामंडळाचे नऊ दावे निकाली काढण्यात आले. त्यामध्ये ४६ लाख ९० हजार रुपयांची नुकसान भरुपाई देण्यात आली. एसटी महामंडळाकडून अ‍ॅड. अतुल गुंजाळ यांनी काम पाहिले.