पुणे : शिक्षकांचा गौरव करणाऱ्या उपक्रमांसह शिक्षक दिनी सरकारच्या निषेधार्ध आंदोलनेही करण्यात आली. त्यात कनिष्ठ महाविद्यालय शिक्षक महासंघाच्या आंदोलनात ५० हजार शिक्षकांनी काळी फित लावून काम केले, तर महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीच्या सामूहिक रजा आंदोलन केले. त्यात राज्यभरातील ६५ हजार शिक्षक सहभागी झाल्याचा, ७ हजार २०० पेक्षा अधिक शाळा बंद राहिल्याचा दावा संघटनेचे राज्य अध्यक्ष विजय कोंबे यांनी केला.
शिक्षण हक्क कायद्यांतर्गत शिक्षकांना निवडणूक आणि जनगणना वगळता अन्य अशैक्षणिक कामे शालाबाह्य कामे देता येत नसल्याची तरतूद शिक्षण हक्क कायद्यात आहे. तसेच अशैक्षणिक कामांमुळे अध्यापनाला वेळ मिळत नसल्याने निरक्षर सर्वेक्षणाचे काम शिक्षकांकडून करून घेण्यात येऊ नये, असे निवेदन शिक्षण विभागाला देण्यात आले होते. अशैक्षणिक कामाचा अतिरेक बंद करा, शिक्षकांना शिकवू द्या यासह विविध मागण्यांसाठी महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीतर्फे मंगळवारी शिक्षक दिनी सामूहिक रजा आंदोलन करण्यात आले. तर राज्यातील कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षकांच्या मागण्यांबाबत शासन निर्णय घेतल्याने महाराष्ट्र राज्य कनिष्ठ महाविद्यालय शिक्षक महासंघाने काळी फित लावून शासनाचा निषेध केला. त्यात राज्यभरातील पन्नास हजार शिक्षक सहभागी झाल्याची माहिती महासंघाचे समन्वयक प्रा. मुकुंद आंधळकर यांनी दिली.