पुणे : ‘काश्मीर येथे गेलेल्या ६५७ पर्यटकांनी जिल्हा आपत्ती नियंत्रण कक्षास संपर्क साधला असून, रविवारपर्यंत (२७ एप्रिल) १४८ पर्यटक पुण्यात येणार आहेत. तर, गुरुवारी सकाळी विमानाने ११ प्रवासी पुण्यात पोहोचले आहेत,’ अशी माहिती जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी दिली. जम्मू-काश्मीरमध्ये पुणे आणि जिल्ह्यातून काही पर्यटक स्वतंत्रपणे, तर काही सहल नियोजन करणाऱ्या कंपन्यांच्या माध्यमातून पर्यटनासाठी गेले आहेत. त्यांची माहिती मिळविण्यासाठी जिल्हा प्रशासनाकडून हेल्पलाइन सेवा सुरू केली आहे.

या हेल्पलाइनवर आलेल्या दूरध्वनींनुसार, शहर आणि जिल्ह्यातील एकूण सहाशेपेक्षा जास्त पर्यटक गेल्याची माहिती जिल्हा प्रशासनाला मिळाली आहे. त्यानुसार त्यांच्याशी आपत्ती व्यवस्थापन विभागाकडून संपर्क साधण्याचा प्रयत्न सुरू झाला आहे. त्यानुसार टप्प्याटप्प्याने पर्यटक पुण्यात येण्यास सुरुवात झाली आहे.

‘गुरुवारी सकाळी दहा वाजता विशेष विमानाने अकरा प्रवासी पुण्यात सुखरूप पोहोचले असून, १९ प्रवासी गुरुवारी रात्रीपर्यंत दाखल होणार आहेत. शुक्रवारी (२५ एप्रिल) २२, तर शनिवारी (२६ एप्रिल) १२ प्रवासी येणार असून, रविवारी (२७ एप्रिल) २९ पर्यटक रेल्वेने पुण्यात पोहोचणार आहेत. आपत्ती व्यवस्थापन नियंत्रण कक्षाच्या माध्यमातून या सर्व पर्यटकांशी संपर्क साधण्यात आला असून, माहिती घेण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे,’ असे जिल्हाधिकारी डुडी यांनी सांगितले.