पुणे : भारतीय कुस्ती महासंघ आणि महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर संघाच्या वतीने ६६ वी वरिष्ठ राज्य अजिंक्यपद, महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा ७ ते १० नोव्हेंबर २०२३ दरम्यान फुलगाव येथील नेताजी सुभाषचंद्र बोस सैनिकी शाळेत पार पडणार आहे. या स्पर्धेत महाराष्ट्र केसरी होणाऱ्या विजेत्या कुस्तीगीरला महिंद्रा थार तसेच उपमहाराष्ट्र केसरी कुस्तीगीराला ट्रॅक्टर असे बक्षीस दिले जाणार आहे, अशी माहिती स्पर्धेचे स्वागताध्यक्ष पुणे जिल्हा मध्यवर्ती बँकेचे सदस्य प्रदीप कंद यांनी पत्रकार परिषदेत दिली.
यावेळी महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर संघाचे कार्याध्यक्ष संदीप भोंडवे, सरचिटणीस योगेश दोडके आणि विलास कथुरे उपस्थित होते. स्पर्धेचे स्वागताध्यक्ष प्रदीप कंद म्हणाले की, महाराष्ट्र केसरी स्पर्धेचे उद्घाटन ७ नोव्हेंबर रोजी सायंकाळी ५ वाजता राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर संघाचे अध्यक्ष खासदार रामदास तडस आणि उपाध्यक्ष मुरलीधर मोहोळ यांच्या उपस्थितीमध्ये होणार. तर स्पर्धेच बक्षीस वितरण १० नोव्हेंबर रोजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्या हस्ते होणार. सुभाषचंद्र बोस सैनिकी शाळेमध्ये साधारण ५० हजार प्रेक्षक क्षमता असलेले स्टेडीयम उभारण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.
हेही वाचा – पुणे: करोडपती फौजदाराला निलंबनानंतर आता शरीरसौष्ठवाचा छंद!
हेही वाचा – मेट्रो स्थानकावर आता गाडी घेऊन जा! महामेट्रोकडून लवकरच १२ वाहनतळ सुरु होणार
प्रदीप कंद पुढे म्हणाले की, या स्पर्धेत ३६ जिल्हा आणि ६ महानगरपालिका असे एकूण ४२ संघ सहभागी होत आहेत. एका कुस्ती संघात गादी विभागातील १० आणि माती विभागातील १० असे एकूण २० कुस्तीगीर २ कुस्ती मार्गदर्शक आणि १ संघ व्यवस्थापक असे एकूण २३ जणांचा सहभाग असणार आहे. तसेच या कुस्ती स्पर्धेत ८४० कुस्तीगीर ८४ कुस्ती मार्गदर्शक आणि ४२ व्यवस्थापक, ८० पंच आणि ५० पदाधिकारी असे एकूण ११०० जणांचा सहभाग असणार, असे त्यांनी सांगितले.