पुणे शहरातील १८ वर्षापुढील सर्व नागरिकांना शुक्रवारपासून (१५ जुलै) विनामूल्य वर्धक मात्रा देण्यास सुरुवात केली आहे. त्यासाठी पंधरा क्षेत्रीय कार्यालयांच्या हद्दीमध्ये ६८ केंद्र निश्चित करण्यात आली असून या केंद्रांवर कोव्हॅक्सिन आणि कोविशिल्ड करोना प्रतिबंधक दोन्ही लशींची मात्रा दिली जाणार आहे.

शहरातील अठरा वर्षावरील सर्व नागरिकांनी या केंद्रात जाऊन लस घ्यावी, असे आवाहन महापालिकेचे लसीकरण अधिकारी डॅा. सूर्यकांत देवकर यांनी केले. लशीची दुसरी मात्रा घेतल्यानंतर सहा महिने किंवा २६ आठवडे पूर्ण झालेल्या तसेच मागील तीन महिन्यात करोनाचा संसर्ग न झालेल्या व्यक्ती वर्धक मात्रेसाठी पात्र आहेत. घराच्या जवळील महापालिकेच्या दवाखाना अथवा रुग्णालयात जाऊन लस घ्यावी, असे आवाहन आरोग्य विभागाने केले आहे.

नागरिकांना ऑनलाइन नोंदणी करून किंवा प्रत्यक्ष केंद्रावर येऊन नोंदणी करूनही लस घेता येईल. निश्चित कोट्यानुसार या लशींच्या मात्रा उपलब्ध होतील. ऑनलाइन बुकिंगसाठीची नोंदणी सकाळी आठ वाजता सुरू होईल, अशी माहिती महापालिकेचे लसीकरण अधिकारी डॉ. सूर्यकांत देवकर यांनी दिली.

Story img Loader