काठमांडू शहरात सर्वत्र हाहाकार उडाला आहे. ढासळलेल्या इमारतींचे ढिगारे, उखडलेले रस्ते, जखमींचा आक्रोश, मृतदेहांना पाहून उडणारा थरकाप आणि यातून वाचलेल्यांचे थिजलेले चेहरे.. सारे काही सुन्न करणारे आहे.. प्रसिद्ध गिर्यारोहक उमेश झिरपे भूकंपग्रस्त काठमांडूतून ‘लोकसत्ता’शी बोलत होते.
‘एव्हरेस्ट बेस कॅम्प’ मोहिमेसाठी पुण्याच्या ‘गिरिप्रेमी’ संस्थेचे १२ गिर्यारोहक शनिवारी सकाळी काठमांडू शहरात दाखल झाले. एका नव्या मोहिमेची स्वप्ने घेऊन आलेल्या या गिर्यारोहकांना मात्र इथे पाऊल ठेवताच एका भयाण संकटाला सामोरे जावे लागले. भूकंपाने उद्ध्वस्त झालेल्या याच शहरातून फिरताना आलेले अनुभव झिरपे ‘लोकसत्ता’ला सांगत होते. झिरपे त्यांच्या कुटुंबीयांसोबत शुक्रवारीच इथे आले आहेत. सकाळी पशुपतिनाथाचे दर्शन घेऊन ते अन्य सहकाऱ्यांना घेण्यास विमानतळावर जात असतानाच त्यांनी हा हाहाकारी भूकंप अनुभवला.  झिरपे म्हणाले, मी मंदिरातून बाहेर पडलो आणि अचानक दोन्ही बाजूंच्या इमारती पत्त्याच्या बंगल्याप्रमाणे कोसळू लागल्या. सर्वत्र आरडाओरडा, किंकाळय़ा ऐकू येत होत्या. सर्वत्र इमारतींचे ढिगारे कोसळले होते. वाचलेले लोक सैरावैरा धावत होते. जखमी मदतीची याचना करत होते. काही कळण्याच्या आत हे सगळे डोळय़ांसमोर घडल्याने काहीच सुचत नव्हते. सुन्न झालो होतो.  या परिस्थितीतून आम्ही स्वत: अगोदर सावरलो आणि मग मदत सुरू केली. काही वेळातच नेपाळ सरकारच्या मदत यंत्रणेने काम सुरू केले. पण या आपत्तीचे भीषण स्वरूप पाहता या मदतीला खूप मर्यादा जाणवत आहेत. एकतर या भूकंपाने सर्व रस्ते उखडलेले आहेत. मोठय़ा भेगा पडल्या आहेत. दळणवळणाबरोबर संपर्क यंत्रणाही ठप्प झाली आहे. भूकंपाने ढासळलेल्या इमारतींमध्ये रुग्णालयांचाही समावेश असल्याने उपचारांवरही मर्यादा येत आहेत.  संध्याकाळपर्यंत आम्ही महाराष्ट्रातून आलेले गिर्यारोहक, नेपाळमधील सहकारी, काही शेर्पा यांच्या मदतीने प्रत्यक्ष मदतकार्य सुरू केले आहे. यामध्ये प्रामुख्याने मानसिक आधार देण्याचे काम आम्ही करत आहोत. इथे एका मैदानावर सगळे लोक जमा झाले आहेत. यामध्ये बेघर जसे आहेत तसेच सधन घरातले लोकही आहेत. या साऱ्यांच्या चेहऱ्यावर वर्तमानाचे भय आहे आणि उद्याची चिंताही. या साऱ्यांना सावरताना दिवसभर अनुभवलेले उद्ध्वस्त शहर आणि थिजलेले चेहरेच सतत समोर येत होते.
आठ गिर्यारोहकांचा मृत्यू?
एप्रिल-मे हा हिमालयातील विविध मोहिमांचा काळ असतो. सर्वोच्च शिखर ‘एव्हरेस्ट’ सर करण्यासाठीही जगभरातून या काळातच गिर्यारोहक नेपाळमध्ये दाखल होत असतात. शनिवारी झालेल्या या भूकंपामध्ये एव्हरेस्टचा तळच उद्ध्वस्त झाला आहे. यामध्ये आठ गिर्यारोहकांचा मृत्यू झाल्याची भीती व्यक्त होत आहे. ‘मकालू’ शिखर मोहिमेचा ‘अ‍ॅडव्हान्स बेस कॅम्प’ही उद्ध्वस्त झाल्याचे प्रसिद्ध गिर्यारोहक अर्जुन वाजपेयी यांनी सांगितले.

Story img Loader