पुण्याच्या मावळमध्ये जमिनीला सोन्याचा भाव आहे. यामुळंच जमीन व्यवहारात फसवणुकीच्या घटना घडतात. हिंजवडीत राहणाऱ्या शिरीष शिवाजी रेडकर यांची जमीन खरेदी प्रकरणी सात लाखांची फसवणूक झाली आहे. याबाबत आरोपी पूर्णचंद्र सनातन स्वाईन याच्या विरोधात पिंपरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ते गुडवीन सिटी जमीन खरेदी विक्रीचे मालक आहेत असे तक्रारीत म्हटलं आहे.
हेही वाचा- पत्नीचा छळ करणाऱ्या पोलिसाविरोधात गुन्हा दाखल
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी शिरीष रेडकर यांचा आरोपी पूर्णचंद्र याच्याशी मावळमधील चांदखेड येथील गट क्रमांक. ४८५ मधील २४०० स्केअर फूट जमिनीसबंधी व्यवहार झाला होता. ती जागा आरोपी पूर्णचंद्र याने स्वतःच्या मालकीची असल्याचं शिरीष यांना सांगितलं होतं. दोघांमध्ये जागे संबंधी ७ लाख ३९ हजारांचा व्यवहार झाला. पण, २०१६ पासून अद्याप ही जमिनीचे खरेदी खत आणि रजिस्ट्रेशन झालं नाही. अखेर, शिरीष यांनी मेलद्वारे जमीन खरेदी करायचं नाही अस सांगून व्यवहार रद्द केला आहे. या प्रकरणी पिंपरी पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास पिंपरी पोलीस करत आहेत.