पुणे : पुणे रेल्वे स्थानकाच्या आवारातून दोन दिवसांपूर्वी सात महिन्यांच्या बालकाचे अपहरण करणाऱ्या चोरट्याला बंडगार्डन पोलिसांनी अटक केली. बालकाचे अपहरण केल्यानंतर त्याची तीन लाख रुपयांमध्ये दक्षिण सोलापूरमधील एकास विक्री करण्यात आल्याचे तपासात उघडकीस आले आहे. बालकाची सुखरूप सुटका करण्यात आली असून, अपहरण करणाऱ्या टोळीच्या मुख्य सूत्रधाराचा शोध सुरू आहे. या टाेळीकडून अनेक गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

चंद्रशेखर मालकाप्पा नड्डगंड्डी (वय २४, रा. जांबगी, जि. विजापूर, कर्नाटक), सुभाष पुतप्पा कांबळे (वय ५५, रा. लवंगी, जि. सोलापूर) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत. आरोपी चंद्रशेखर आणि साथीदारांनी अपहरण केलेल्या बालकाची तीन लाख रुपयांमध्ये सुभाष कांबळे याला विक्री केल्याचे तपासात उघडकीस आले आहे. कांबळे याच्या ताब्यातून बालक ताब्यात घेण्यात आले आहे, अशी माहिती परिमंडळ दोनच्या पोलीस उपायुक्त स्मार्तना पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली.

हेही वाचा : पंतप्रधानांनी आपल्या गुरूविषयी वापरलेली भाषा निषेधार्ह; काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्याची टीका

पुणे रेल्वे स्थानकाच्या परिसरातून सात महिन्यांच्या बालकाचे अपहरण करण्यात आल्याची घटना शुक्रवारी (२७ एप्रिल) मध्यरात्री घडली होती. बंडगार्डन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. याबाबत अजय तेलंग यांनी बंडगार्डन पोलीस ठाण्यात तक्रार दिली होती. तेलंग दाम्पत्य मूळचे यवतमाळचे आहे. आईला भेटण्यासाठी तेलंग आणि त्याची पत्नी पुण्यात आले होते. २६ एप्रिल रोजी मध्यरात्री पुणे रेल्वे स्थानकाच्या आवारात तेलंग दाम्पत्य झोपले होते. त्यावेळी अनोळखी व्यक्तीने तेलंग यांचा सात महिन्यांचा मुलगा श्रावण याला उचलून नेले. तेलंग दाम्पत्याला जाग आली, तेव्हा श्रावण जागेवर नसल्याचे आढळून आले. तेलंग दाम्पत्याने त्याचा शोध घेतला. मात्र, तो सापडला नाही. त्यानंतर घाबरलेल्या तेलंग दाम्पत्याने बंडगार्डन पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दिली.

बंडगार्डन पोलिसांनी तातडीने तपास सुरू केला. पुणे रेल्वे स्थानक परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांनी केलेले चित्रीकरण तपासासाठी ताब्यात घेण्यात आले. चित्रीकरणात अपहरण करणारी एक व्यक्ती अस्पष्टपणे दिसून आली होती. पुणे रेल्वे स्टेशन परिसरातील अलंकार चित्रपटगृहापासून आरोपी मोटारीतून पसार झाल्याचे आढळून आले होते. पोलिसांनी ५० ठिकाणचे सीसीटीव्ही तपासले. तांत्रिक तपासात आरोपी कर्नाटकातील विजापूर परिसरात असल्याचे निष्पन्न झाले होते. यानंतर पोलिसांनी विजापूर येथे सापळा लावून चंद्रशेखर नड्डगंड्डी याला ताब्यात घेतले. नड्डगंड्डी याला पोलिसी खाक्या दाखवताच गुन्ह्याची कबुली दिली. चार साथीदारांच्या मदतीने पुणे रेल्वे स्थानकातून बालकाचे अपहरण केल्याचे त्याने सांगितले. बालकाची विक्री तीन लाख रुपयांमध्ये सुभाष कांबळेला केल्याचे त्याने सांगितले. पोलिसांनी विजापूर येथील एका हाॅटेलमधून कांबळेला ताब्यात घेतले. त्याच्या ताब्यातून बालकाची सुखरूप सुटका करण्यात आली.

हेही वाचा : मावळमध्ये महायुतीत अस्वस्थता? दिल्लीहून सहा जणांचे पथक दाखल

वरिष्ठ पोलीस निरीक्षक संदीपान पवार, गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्रीकांत निंबाळकर यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक संदीप मधाले, पोलीस उपनिरीक्षक रवींद्र गावडे, चेतन धनवडे, सुधीर घोटकुले, ज्ञानेश्वर बडे, सागर घोरपडे, मंगेश बोराडे, शिवाजी सरक, मनोज भोकरे, ज्ञानेश्वर गायकवाड, राजु धुलगुडे, विलास केकान यांनी ही कामगिरी केली.

संपत्तीला वारस

आरोपी सुभाष कांबळेने तीन लाख रुपयांत आरोपींकडून बालक विकत घेतले. कांबळे याचा मुलगा आणि सुनेचा अपघाती मृत्यू झाला होता. कांबळे शेतकरी असून, संपत्तीला वारस हवा म्हणून त्याने तीन लाख रुपयांत आरोपींकडून बालक विकत घेतले. संपत्तीला वारस हवा म्हणून त्याने मूल दत्तक कोठे मिळते, याबाबत विचारणा केली होती. कांबळे आरोपींच्या संपर्कात आले. तेव्हा तीन लाख रुपयांत बालक मिळेल, असे आरोपींनी सांगितले. कांबळेने आरोपींना काही रक्कम आगाऊ दिली होती.

हेही वाचा : कोव्हिशिल्ड लशीमुळे धोका किती? कोविड कृती दलाचे अध्यक्ष डॉ. रमण गंगाखेडकरांनी दिलं उत्तर…

पोलीस आयुक्तांकडून एक लाखाचे बक्षीस

बालकाचा शोध घेणाऱ्या बंडगार्डन पोलीस ठाण्यातील तपास पथकाला पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी एक लाख रुपयांचे रोख बक्षीस जाहीर केले आहे. बालकाचे अपहरण करणाऱ्या टाेळीने आणखी काही गु्न्हे केल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. मुख्य सूत्रधाराचा शोध घेण्यात येत आहे.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: 7 month old child kidnapped from pune station was sold for rupees 3 lakhs two arrested by pune police pune print news rbk 25 css
Show comments