शारीरिक अपंगत्व असलेल्या विशेष खेळाडूंसाठी होणाऱ्या ‘विशेष ऑलिम्पिक’ स्पर्धेसाठी पुण्यातील सात तरुणांची निवड झाली असून, हे खेळाडू बाल कल्याण संस्थेतर्फे या स्पर्धामध्ये सहभागी होणार आहेत. ही स्पर्धा डिसेंबर महिन्यात ऑस्ट्रेलियात होणार आहे.
पुण्यातील प्रणव दिवेकर, अमित कुलकर्णी, ऋत्विक जोशी, प्रणव कुंटे हे पोहणे या क्रीडाप्रकारात, गोपेश कोठारी हा टेबल टेनिस खेळात, तर मधुमती इंदलकर आणि मीनाक्षी होले या दोघी हॉकीसारख्या ‘बॉची’ या क्रीडाप्रकारात सहभागी होणार आहेत. या विद्यार्थ्यांचे प्रशिक्षक म्हणून अभिजित तांबे त्यांच्यासोबत जाणार आहेत, अशी माहिती संस्थेच्या कार्यकारी संचालक मिनीता पाटील यांनी दिली. यापूर्वीसुद्धा या स्पर्धासाठी पुण्यातील काही तरुण सहभागी झाले होते. मात्र, या वर्षी त्यांची संख्या मोठी आहे, असेही त्यांनी सांगितले.
अंपगांसाठी असलेली ‘स्पेशल ऑलिम्पिक स्पर्धा’ दरवर्षी घेतली जाते. त्यात सहभागी होण्यासाठी निवडस्पर्धा मुंबईत पार पडली. त्यात चांगली कामगिरी केल्यामुळे पुण्यातील या सात जणांना ऑस्ट्रेलियाला जाण्याची संधी मिळणार आहे. या विद्यार्थ्यांना प्रशिक्षण देणारे अभिजित तांबे यांनी सांगितले, की या मुलांना प्रशिक्षण देणे हे कौशल्याचे काम आहे. त्यासाठी वेळसुद्धा जास्त लागतो. मात्र, या मुलांनी आपल्या मर्यादांवर मात करून उत्तम कामगिरी केली आहे. त्यामुळेच त्यांची या स्पर्धासाठी निवड होऊ शकली.

कोरियामध्ये पुढील आठवडय़ात होणाऱ्या ‘ग्लोबल आयटी चॅलेंज फॉर युथ वुईथ डिसॅबिलिटी’ या स्पर्धेसाठी या संस्थेमार्फत तीन विद्यार्थी तिकडे जाणार आहेत. त्यात मोहनीश निकम, नेहा कुलकर्णी आणि हार्दिक शहा यांचा समावेश आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा