पुणे : गणेशोत्सवात विक्रेत्यांना श्रीफळ पावले आहे. पूजा, तोरणांसाठी नारळाच्या मागणीत मोठी वाढ झाली आहे.  पुणे-मुंबई परिसरातच उत्सव कालावधीत दररोज ७० ते ८० लाखांहून जास्त नारळांची विक्री होत असून, गणेशोत्सवात नारळ विक्रीत २० ते २५ टक्क्यांनी वाढ झाली आहे. किरकोळ बाजारात एका नारळाची किंमत प्रकारानुसार २० ते ४० रुपये दरम्यान आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

 उत्सवाच्या काळात राज्यात पुणे आणि मुंबई या दोन शहरांत नारळांची विक्री मोठय़ा प्रमाणावर होते. उत्सव सुरू होण्यापूर्वी तीन ते चार दिवस आधी पुण्यातील मार्केट यार्ड, तसेच नवी मुंबईतील वाशी बाजारात तमिळनाडू, आंध्र प्रदेश आणि कर्नाटकातून नारळांची आवक सुरू झाली. नारळांना मागणी वाढली असून, दरात अल्पशी वाढ झाली आहे, अशी माहिती मार्केट यार्ड भुसार बाजारातील व्यापारी दीपक बोरा यांनी दिली.

हेही वाचा >>> पुणे: विसर्जन हौद व्यवस्था पाहणाऱ्या आरोग्य कर्मचाऱ्याला वीजेचा धक्का, हॅपी कॉलनीतील घटना, दोन्ही पाय जळाले

मार्केट यार्डातील भुसार बाजारात दररोज चार ते पाच हजार पोती नारळांची आवक होत असून, एका पोत्यात शंभर नारळ असतात. दररोज साडेतीन ते पाच लाख नारळ बाजारात विक्रीसाठी पाठविले जात आहेत.

तोरणासाठी नवा नारळ वापरला जातो. तमिळनाडूतून नव्या नारळाची आवक होत आहे. कर्नाटकातून मद्रास आणि सापसोल जातीच्या नारळांची आवक होत आहे. आंध्र प्रदेशातून पालकोल जातची आवक होत आहे.

मिठाई विक्रेत्यांकडून मागणी.. 

उत्सवाच्या कालावधीत खाद्यपदार्थ विक्रीत मोठी वाढ होते. उपाहारगृहचालक, केटिरग व्यावसायिक, तसेच खाद्यपदार्थ विक्रेत्यांकडून नारळांच्या मागणीत वाढ झाली आहे. सापसोल, मद्रास या जातीच्या नारळांचे खोबरे चवीला गोड असते. खाद्यपदार्थ तयार करण्यासाठी सापसोल आणि मद्रास जातीच्या नारळांना मागणी असते. गणेशोत्सव, नवरात्रोत्सव, दिवाळीपर्यंत नारळाला चांगली मागणी असते, असे व्यापारी दीपक बोरा यांनी सांगितले.

प्रकार आणि दर (१०० नारळ)

नवा नारळ १३०० ते १४५० रुपये

पालकोल १३२५  ते १४५० रुपये

मद्रास  २३५० ते २५०० रुपये

सापसोल १७०० ते २४०० रुपये

वाहतूक खर्च, मजुरी वाढली आहे. त्यामुळे नारळाच्या दरात अल्पशी वाढ झाली आहे. गणेशोत्सवात नारळांना सर्वाधिक मागणी असते.

– दीपक बोरा, नारळ व्यापारी, मार्केट यार्ड, भुसार बाजार

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: to 80 lakhs daily coconut sales in pune and mumbai in ganeshotsav zws