पुणे : जिल्ह्यात गेल्यावर्षी सप्टेंबर, ऑक्टोबरमध्ये नैसर्गिक आपत्ती आणि अतिवृष्टीमुळे शेतीपिके, फळपिकांचे नुकसान झाले होते. त्यामध्ये ३३ टक्के किंवा त्यापेक्षा अधिक नुकसान झालेल्या ८५ हजार ४४५ शेतकऱ्यांना ७३ कोटी ६० लाख ३८ हजार रुपये नुकसान भरपाई ऑनलाइन पद्धतीने देण्यास सुरुवात करण्यात आली असून, सुमारे ८० टक्के काम पूर्ण झाले आहे.
जून ते ऑगस्ट २०२२ या कालावधीत अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना नुकसानीसाठी तीन कोटी १४ लाख २१ हजार रुपये आणि शेतजमीन खरडून झालेल्या नुकसानीपोटी १३ लाख ६४ हजार रुपये इतकी मदत देण्यात आली आहे. तसेच जिल्ह्यात चालू वर्षी मार्चमध्ये अतिवृष्टीमुळे एकूण ८४ गावांतील १४३४ शेतकऱ्यांच्या ४०८.९४ हेक्टर क्षेत्राचे नुकसान झाले आहे. या नुकसानीपोटी ७० लाख ७० हजार रुपये निधीची मागणी केली आहे, असे निवासी उपजिल्हाधिकारी हिम्मत खराडे यांनी सांगितले.
हेही वाचा – पुणेकरांची सर्वाधिक पसंती दुचाकींना!
हेही वाचा – पुण्यात ओला कॅबचालकाचे प्रवासी महिलेशी अश्लील चाळे; कॅबचालकाविरुद्ध गुन्हा
तालुकानिहाय मदत, कंसात बाधित शेतकरी
जिल्ह्यात सप्टेंबर ते ऑक्टोबर २०२२ मध्ये नैसर्गिक आपत्ती आणि अतिवृष्टी झाली होती. भोरमध्ये २३ लाख दहा हजार (५२३), वेल्ह्यात ३९ हजार (११), मावळात तीन लाख २६ हजार (११४), हवेलीतील आठ कोटी ३३ लाख दोन हजार (७४९०), खेड दोन कोटी दोन लाख २३ हजार (१९४७), आंबेगाव चार कोटी ९६ लाख ६९ हजार (९७७९), जुन्नर २४ कोटी ५१ लाख ४६ हजार (२२, ५९१), शिरूर चार कोटी ५६ लाख ६६ हजार (४७३४), पुरंदर २१ कोटी २६ लाख ५७ हजार (२७, ८४१), दौंड दोन कोटी १४ लाख ८० हजार (२००८) आणि बारामतीमध्ये पाच कोटी ५२ लाख २० हजार (८४१७) अशी एकूण ७३ कोटी ६० लाख ३८ हजार रुपये नुकसान भरपाईची रक्कम आहे.