पुणे : पुणे, पिंपरी-चिंचवड आणि उर्वरित ग्रामीण भागातील जिल्ह्यातील २१ विधानसभा मतदारसंघांची मतदार यादी जिल्हा निवडणूक शाखेकडून नुकतीच प्रसिद्ध करण्यात आली. त्यानुसार सर्वाधिक ११ हजार २२३ मतदार हडपसर मतदारसंघात वाढले आहेत. त्याखालोखाल भोसरी मतदारसंघात ७८२६, तर खेड मतदारसंघात ६६७६ मतदार वाढले आहेत.
चालू वर्षी महापालिकांच्या निवडणुका जाहीर झाल्यास ही मतदारयादी वापरली जाणार आहे. त्यामुळे, या यादीला महत्त्व प्राप्त झाले आहे. प्रारूप मतदार यादी गेल्या वर्षी ९ नोव्हेंबरला जाहीर करण्यात आली होती. त्यामध्ये जिल्ह्यात ७८ लाख ७६ हजार ९५० मतदार होते. त्यानंतर नवमतदार, समाजातील वंचित घटकांसाठी मतदार नोंदणीच्या खास मोहिमांचे आयोजन केले होते. त्यामुळे प्रारूप मतदार यादीनंतर अंतिम यादीत ७४ हजार ४७० मतदार वाढले आहेत.
प्रारूप यादी आणि अंतिम यादीचा विचार करता शहरातील हडपसर, पिंपरी-चिंचवडमधील भोसरी आणि ग्रामीण भागातील खेड मतदारसंघात जास्त मतदार वाढले आहेत. जिल्ह्यात एकूण ७९ लाख ५१ हजार ४२० मतदार झाले आहेत. जिल्ह्याची प्रारूप मतदार यादी ९ नोव्हेंबर रोजी जाहीर झाली होती. त्यानंतर अंतिम मतदारयादी प्रसिद्ध होण्यापूर्वी घेण्यात आलेल्या मतदार नोंदणीत ग्रामीण भागातील दहा विधानसभा मतदारसंघांपैकी जुन्नरमध्ये १९४५, आंबेगावमध्ये २४२६, खेडमध्ये ६६७६, शिरूरमध्ये ३५७४, दौंडमध्ये ७३, इंदापूरात ३१२१, बारामतीमध्ये २८४६, पुरंदरमध्ये १८५२, भोरमध्ये ३५०१ असे २८ हजार ६७८ मतदार वाढले आहेत.
दरम्यान, पिंपरी-चिंचवडमधील तीन विधानसभा मतदारसंघांपैकी चिंचवडमध्ये ४४२७, पिंपरीत १४४९, तर भोसरी मतदारसंघात ७८७६ असे १३ हजार ७५२ मतदार वाढले आहेत, असे जिल्हा निवडणूक शाखेकडून सांगण्यात आले.
मतदार म्हणून नाव कसे शोधाल?
मतदार यादीत नाव आहे किंवा कसे, हे http://www.nvsp.in या संकेतस्थळावर किंवा voters helpline या मोबाइल उपयोजनवर (ॲप) संपूर्ण नाव, वय, लिंग, राज्य, जिल्हा आणि विधानसभा मतदारसंघ ही माहिती भरल्यानंतर समजेल.