पुणे : ‘हिट अँड रन २०२३’ या नवीन कायद्यानुसार अपघात प्रसंगी पळून जाणाऱ्या चालकाला दहा वर्षे शिक्षा व लाखो रुपये दंड आकारण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे. या निर्णया विरोधात सर्व चालकांमध्ये तीव्र रोष निर्माण झाला आहे. हा काळा कायदा रद्द करावा आणि चालकांच्या इतर प्रलंबित मागण्या मान्य कराव्या यासाठी बुधवारी ३ जानेवारी पासून दिल्ली मध्ये जंतर मंतर येथे धरणे आंदोलन करण्यात येणार आहे.
देशभरात एकूण २२ ते २५ कोटी चालक आहेत. यामध्ये मालवाहतूक, प्रवासी वाहतूक तसेच रिक्षाचालकांचा समावेश आहे. या चालकांच्या अनेक वर्षांपासून विविध मागण्या आहेत. त्याकडे केंद्र सरकारने दुर्लक्ष केले असून या मागण्या मान्य करण्यासाठी आता देशभरातील चालकांच्या ७५० संघटना एकत्रितपणे जंतर-मंतर येथे आंदोलन करत आहेत. पुणे, पिंपरी चिंचवड शहर आणि पुणे जिल्ह्यातून हजारो चालक दिल्लीमध्ये आंदोलनात सहभागी होणार आहेत अशी माहिती ऑटो, टॅक्सी, ट्रक, बस, चालक मालक फेडरेशनचे राष्ट्रीय अध्यक्ष बाबा कांबळे यांनी मंगळवारी दिली.
हेही वाचा >>> ‘दहा दिवसांत एमबीए होता येत नाही,’एमबीए क्रॅश कोर्सबाबत एआयसीटीईकडून सावधगिरीचा इशारा
दिल्लीमध्ये येऊ शकणार नाहीत अशा चालकांनी महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आणि प्रादेशिक व उपप्रादेशिक परिवहन (आरटीओ) कार्यालयासमोर बुधवारी (ता.३) सकाळी १० वाजता आंदोलन करून जिल्हाधिकाऱ्यांना आपल्या मागणीचे निवेदन द्यावे, असे आवाहनही कांबळे यांनी केले आहे.
संघटनेच्या मागण्या
– अपघात घडल्यास चालकाला दहा वर्षांची शिक्षा आणि दहा लाख रुपये दंड असलेला काळा कायदा मागे घ्यावा.
– देशातील सर्व चालक आणि मालकांसाठी राष्ट्रीय कल्याण मंडळाची स्थापना करावी.
– राष्ट्रीय चालक आयोग स्थापन करावा.
– सरकारने देशभरात चालक दिन साजरा करावा.
– दिल्लीत चालकांसाठी राष्ट्रीय स्मारक बांधावे.