पुणे : वैभवशाली परंपरा असलेल्या पुण्यातील गणेशोत्सवाचा प्रारंभ बुधवारी (३१ ऑगस्ट) होणार असून उत्सवाच्या काळात अनुचित घटना टाळण्यासाठी शहरात कडक पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात येणार आहे. उत्सवाच्या काळात साडेसात हजार पोलिसांचा बंदोबस्त ठेवण्यात येणार आहे. संभाव्य घातपाती कारवायांच्या पार्श्वभूमीवर बंदोबस्ताची आखणी करण्यात आली असून उत्सवाच्या काळातील दहा दिवस शहर तसेच उपनगरात पोलिसांचा खडा पहारा राहणार आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

गेले दोन वर्ष गणेशोत्सवावर करोना संसर्गामुळे निर्बंध होते. त्यामुळे गणेशोत्सव साधेपणाने साजरा करण्यात आला. यंदाचा उत्सव निर्बंधमुक्त होणार असल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जाहीर केले. पुण्यातील गणेशोत्सवात राज्य, परराज्य तसेच परदेशातून भाविक येतात. उत्सवाच्या काळात गर्दीचे नियोजन तसेच संभाव्य अनुचित घटना टाळण्यासाठी पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता, सहपोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांच्या मार्गदर्शनाखाली गेल्या महिनाभरापासून बंदोबस्ताची आखणी करण्यात आली. यंदाच्या उत्सवात शहरात विशेषत: मध्यभागात भाविकांची मोठी गर्दी होण्याची शक्यता आहे. त्यामुळे शहर परिसरात कडक बंदोबस्त तैनात करण्यात येणार आहे, अशी माहिती पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी सोमवारी (२९ ऑगस्ट) पत्रकारांशी बोलताना दिली. अतिरिक्त पोलीस आयुक्त राजेंद्र डहाळे, अतिरिक्त आयुक्त नामदेव चव्हाण, परिमंडळ एकच्या पोलीस उपायुक्त प्रियंका नारनवरे, विशेष शाखेचे उपायुक्त पी. राजा. वाहतूक शाखेचे उपायुक्त राहुल श्रीरामे आदी या वेळी उपस्थित होते.

हेही वाचा >>> मेट्रो पुलामुळे विसर्जन मिरवणुकीतील रथांच्या उंचीवर मर्यादा ; रथांची उंची कमी ठेवण्याचे पोलिसांचे आवाहन

उत्सवाच्या कालावधीत साडेसात हजार पोलीस कर्मचारी, सातशे अधिकारी, शीघ्र कृती दल, गु्न्हे शाखेची पथके तैनात राहणार आहेत. त्याबरोबरच राज्य राखीव दलाचे जवान, गृहरक्षक दलाचे जवान बंदोबस्तात सहभागी होणार आहेत. गुन्हे शाखा आणि विशेष शाखेची पथके शहरातील संवेदनशील ठिकाणे तसेच गर्दीच्या भागात साध्या वेशात गस्त घालणार आहेत. बाँब शोधक नाशक पथकाकडून मध्यभागातील मानाच्या मंडळांसह प्रमुख मंडळाच्या परिसरात नियमित तपासणी करण्यात येणार आहे.

उत्सवावर सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची नजर

मध्यभागातील प्रमुख मंडळांना मंडपाच्या परिसरात सीसीटीव्ही कॅमेरे लावण्याचे आवाहन करण्यात आले आहे. शहर परिसरात वेगवेगळ्या भागात सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले आहेत. सीसीटीव्ही कॅमेऱ्यांच्या माध्यमातून उत्सवावर लक्ष ठेवण्यात येणार आहे. गर्दीतील चोऱ्या, छेडछाडीचे प्रकार रोखण्यासाठी गुन्हे शाखेतील पोलीस कर्मचारी साध्या वेशात गस्त घालणार आहेत.

गणेशोत्सवात भाविकांची मोठी गर्दी होण्याची शक्यता आहे. गर्दीचे नियोजन तसेच संभाव्य अनुचित घटना टाळण्यासाठी पोलिसांकडून बंदोबस्ताची आखणी करण्यात आली आहे. प्राणप्रतिष्ठापना सोहळा, विसर्जन मिरवणुकीत सहभागी होणाऱ्या पथकांची संख्या मर्यादित असावी. उत्सवाच्या कालावधीत वाहतूक नियोजनासाठी वेगळा बंदोबस्त ठेवण्यात येणार आहे. यंदा उत्सवावर कोणतेही निर्बंध नाहीत. ध्वनीवर्धकाबाबत सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्देशांचे पालन करणे गरजेचे आहे. निर्देशांचे उल्लंघन करणाऱ्यांच्या विरोधात कारवाई करण्यात येईल.

अमिताभ गुप्ता, पोलीस आयुक्त, पुणे पोलीस

दृष्टीक्षेपात बंदोबस्त

– उत्सवाच्या काळात खडा पहारा

– साडेसात हजार पोलीस बंदोबस्तात

– बॅाम्ब शोधक पथकाकडून गर्दीच्या ठिकाणी तपासणी

– राज्य राखीव पोलीस दलाच्या तुकड्या

– शीघ्र कृती दल, घातपात विरोधी पथक बंदोबस्तात – अनुचित प्रकार रोखण्यासाठी विशेष पथके

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: 7500 policemen deployed during the ganesh festival in pune pune print news zws