गणेशोत्सवात झेंडू उत्पादक शेतकऱ्यांची मात्र निराशा!

गणेशोत्सवात मार्केटयार्डातील  फूलबाजारात पुणे विभागातून १४ हजार क्विंटल फुलांची आवक झाली आणि यंदा आठ कोटी २३ लाख ५१ हजार रूपयांची उलाढाल फूलबाजारात झाली. गेल्या वर्षी घाऊक बाजारात गणेशोत्सवात झेंडूला प्रतिकिलो ५० ते १२० रूपये असा दर मिळाले होते. यंदा गणेशोत्सवात झेंडूला ५ ते ३० रूपये असे दर मिळाल्याने झेंडू उत्पादक शेतक ऱ्यांच्या पदरी निराशा आली. गणेशोत्सव, नवरात्रोत्सव आणि दिवाळी हे तीन सण फूल उत्पादक शेतक ऱ्यांच्या दृष्टीने महत्त्वाचे ठरतात. यंदा फुलांचे उत्पादन चांगले झाल्याने बाजारात फुले मुबलक प्रमाणावर उपलब्ध होती. त्यामुळे फुलांना अपेक्षेएवढे दर मिळाले नाहीत. यंदा अधिक मास आल्याने गणेशोत्सव एक महिना लांबणीवर पडला आणि झेंडू उत्पादक शेतक ऱ्यांचे लागवडीचे वेळापत्रक चुकले. त्यामुळे उत्सवाच्या काळात झेंडूची आवक वाढली.

गणेशोत्सवात मार्केटयार्डातील  फूलबाजारात पुणे विभागातून १४ हजार क्विंटल फुलांची आवक झाली. यंदा फूलबाजारात आठ कोटी २३ लाख ५१ हजार रूपयांची उलाढाल झाली. उत्सवाच्या कालावधीत फुलांच्या मागणीत मोठी वाढ होती. हार विक्रेते, सजावटकार तसेच घरगुती गणेशोत्सवासाठी फुलांना मागणी वाढते. पुण्यातील फूलबाजारातून परराज्यात फुले विक्रीस पाठविण्यात येतात. फुले नाशवंत असतात. मात्र,काही फुले दोन ते तीन दिवस टिकतात. जरबेरा, कार्निशियन, लिलियम, ऑर्चिड, शेवंती, लिलियम, गुलछडी, केवडा ही फुले दोन ते तीन दिवस टिकतात. अनेक सजावटकार दीड ते पाच दिवसांच्या गणेशोत्सवासाठी फुलांची सजावट असलेल्या मखरांची विक्री करतात.

उत्सवाच्या काळात शेवंतीला मोठी मागणी असते. काही वर्षांपूर्वी शेवंतीची आवक परराज्यातून व्हायची. गेल्या दोन वर्षांत पुणे जिल्ह्य़ातील शेतक ऱ्यांनी राजा शेवंती, भाग्यश्री, पिवळी भाग्यश्री या जातींच्या शेवंतीचे उत्पादन घेतले. त्यामुळे शेवंतीची आवक मुबलक प्रमाणावर झाली होती. यंदाच्या वर्षी प्रतवारीनुसार शेवंतीला प्रतिकिलो ५० ते १२० रूपये असा दर मिळाला. गेल्या वर्षी फुलांचे उत्पादन कमी झाले होते. त्यामुळे फुलांचे दर तुलनेने तेजीत होते. यंदा घाऊक बाजारात फुलांची आवक चांगली झाल्याने फुलांना अपेक्षेएवढे दर मिळाले नाहीत, असे मार्केटयार्डातील फूलबाजार विभागाचे प्रमुख प्रदीप काळे यांनी सांगितले.

गणेशोत्सवात झेंडूला प्रतिकिलो पाच ते तीस रूपये असे दर मिळाले. गेल्या वर्षी  गणेशोत्सवात झेंडूला प्रतिकिलो ५० ते १२० रूपये असे दर मिळाले होते. यंदा झेंडू उत्पादक शेतक ऱ्यांना फटका बसला, असे फूलबाजारातील प्रमुख व्यापारी सागर भोसले यांनी सांगितले.