पुणे: कचऱ्याला आग लागल्याने सुमारे एक लाख वीजग्राहकांचा वीज पुरवठा विस्कळीत झाला होता. आळंदी-कळस रस्त्यावरील ‘ग्रेफ सेंटर’समोर असलेल्या ओढ्यात फेकलेल्या कचऱ्याला आग लागली. या आगीत महावितरणच्या आठ वीजवाहिन्या जळाल्या. त्यामुळे विश्रांतवाडी, कळस, धानोरी, लोहगाव परिसरातील सुमारे १ लाख १५ हजार ग्राहकांचा वीजपुरवठा विस्कळीत झाल्याची माहिती महावितरणकडून देण्यात आली.
महावितरणकडून सांगण्यात आले की, नगररोड विभागातील आळंदी-कळस रस्त्यावर ग्रेफ सेंटरसमोर एक ओढा आहे. तेथील एका ट्रेंचमध्ये महावितरणच्या ८ वीजवाहिन्या आहेत व त्याद्वारे विश्रांतवाडी, कळस, धानोरी, लोहगाव, दिघी परिसरातील सुमारे १ लाख ४२ हजार ग्राहकांना वीजपुरवठा केला जातो. मात्र, ओढ्यातील या ट्रेंचवर सातत्याने कचरा टाकण्यात येत होता. साठलेल्या या कचऱ्याला आग लागली. आग वाढल्याने महावितरणकडून पुढील धोका टाळण्यासाठी तातडीने वीजपुरवठा खंडित करण्यात आला. अग्निशमन दलानेही तत्काळ दखल घेत आग विझवल्याचेही महावितरणकडून स्पष्ट करण्यात आले.
‘पर्यायी व्यवस्थेतून वीजपुरवठा सुरळीत करण्याचे व जळालेल्या वीजवाहिन्यांच्या दुरूस्तीचे कामे युद्धपातळीवर सुरू करण्यात आले. या व्यवस्थेतून विश्रांतवाडी, कळस, धानोरी, लोहगाव परिसरातील सुमारे १ लाख १५ हजार ग्राहकांचा वीजपुरवठा पहाटे ५ वाजेपर्यंत टप्प्याटप्प्याने सुरू करण्यात आला. मात्र, विजेच्या वाढलेल्या मागणीमुळे पर्यायी वीजवाहिन्यांवर भार व्यवस्थापन शक्य नसल्याने या परिसरातील सुमारे १० हजार लघुदाब आणि दिघी परिसरातील सुमारे १७ हजार ग्राहकांचा वीजपुरवठा सुरू होऊ शकला नाही,’ अशी माहिती महावितरणकडून देण्यात आली.