आठवीच्या अभ्यासक्रमात फक्त १७ प्रकरणे

इयत्ता आठवीच्या विद्यार्थ्यांचा गणिताचा गृहपाठ आता कमी होणार आहे. आठवीच्या गणिताच्या नवीन पाठय़पुस्तकात केवळ सतराच प्रकरणे आहेत. त्यामुळे  नववी-दहावीच्या दृष्टीने तयारी करण्यासाठी विद्यार्थी आणि शिक्षकांना अधिकचा वेळ मिळू शकणार आहे.

अनेक विद्यार्थ्यांना गणित हा विषय आवडत नाही, काहींना गणिताची भीती वाटते, तर काही विद्यार्थासाठी गणित हा ‘स्कोअरिंग’चा विषय  असतो. अर्थात, काहीही झाले तरी गणित हा शालेय अभ्यासक्रमाचा अपरिहार्य भाग असतो. गणिताच्या नवीन पाठय़पुस्तकातील प्रकरणांची संख्या कमी झाली आहे. २००९ मध्ये गणितातील २६ प्रकरणांची संख्या कमी करून २२ करण्यात आली. आता २२ प्रकरणांवरून १७ प्रकरणेच पाठय़पुस्तकात समाविष्ट करण्यात आली आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांना गणिताच्या गृहपाठासाठी जास्त वेळ द्यावा लागणार नाही, अशी माहिती गणित अभ्यासक दीनानाथ गोरे यांनी दिली.

‘विद्यार्थ्यांना गणित आवडत नसले, तरी शिक्षकांनी वेळ देऊन शिकवल्यास त्याची नक्कीच गोडी लागू शकते. आठवीच्या गणिताच्या पाठय़पुस्तकात असलेली प्रकरणे अतिशय सोपी आहेत. रोजच्या जगण्यातील उदाहरणांतून गणित सहज शिकवता येते. प्रकरणांची संख्या कमी झाल्याने शिक्षकांना जास्त वेळ मिळेल. त्याचा वापर शिक्षकांनी करून घेतला पाहिजे. गणित शिकवण्यासाठी शिक्षकांनी व्यवस्थित नियोजन केले पाहिजे,’ असेही गोरे यांनी सांगितले.

आव्हानात्मक प्रश्न

गणितातील प्रकरणांची संख्या कमी झाली असली, तरी पहिल्यांदाच तारांकित किंवा आव्हानात्मक प्रश्नांचा समावेश पाठय़पुस्तकात करण्यात आला आहे. आजपर्यंत असे प्रश्न पाठय़पुस्तकात समाविष्ट करण्यात आले नव्हते.