हडपसर-सासवड रस्त्यावर मंतरवाडी परिसरात भरधाव डंपरने दुचाकीस्वार महिलेला धडक दिली. अपघातात डंपरच्या चाकाखाली सापडून आठ वर्षांच्या मुलाचा मृत्यू झाल्यानंतर संतप्त जमावाने डंपर पेटवून दिल्याची घटना बुधवारी घडली. याप्रकरणी हडपसर पोलिसांनी डंपरचालकाला ताब्यात घेतले आहे. शौर्य सागर आव्हाळे (वय ८, रा. आव्हाळवाडी) असे मृत्युमुखी पडलेल्या बालकाचे नाव आहे. याप्रकरणी डंपरचालक बालाजी कोंडीबा पोले (वय ३०) याला ताब्यात घेण्यात आले आहे.
हेही वाचा >>> हिंजवडीत कंपनीतील गॅसभट्टीच्या स्फोटात २० कामगार जखमी; चार कामगारांची प्रकृती गंभीर
अक्षय बाबासाहेब भाडळे (वय २६, रा. ऊरळी देवाची) यांनी फिर्याद हडपसर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अक्षय यांची विवाहित बहीण कोमल, भाचा शौर्य, भाची तृणल दुचाकीवरुन निघाले होते. बुधवारी दुपारी मंतरवाडी-कात्रज बाह्यवळण मार्गावर एच. पी. पेट्रोल पंपाजवळ भरधाव डंपरने दुचाकीला पाठीमागून धडक दिली. दुचाकीवरील शौर्य डंपरच्या चाकाखाली सापडला. शाैर्यचा जागीच मृत्यू झाल्यानंतर भाडळे आणि परिसरातील रहिवाशांनी घटनास्थळी धाव घेतली. डंपरचालक डंपर सोडून पसार झाला. संतप्त जमावाने डंपर पेटवून दिला. पसार झालेल्या डंपरचालकाला ताब्यात घेण्यात आले असल्याची माहिती हडपसर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रवींद्र शेळके यांनी दिली.