मार्केट यार्ड भागातील गंगाधाम सोसायटीजवळील वर्धमानपुरा सोसायटीच्या जलतरण तलावात बुडून एका आठ वर्षे वयाच्या मुलाचा गुरुवारी दुपारी साडेचारच्या सुमारास मृत्यू झाला. हा मुलगा उन्हाळ्याच्या सुटीसाठी जळगावहून पुण्यात मामाच्या घरी आला होता. या मुलाचे नेत्रदान करण्याचा निर्णय त्याच्या कुटुंबीयांनी घेतला आहे.
क्रिश दिनेश राका (रा. नहाटा रुग्णालयाजवळ, जळगाव) असे मृत्यू झालेल्या मुलाचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, क्रिश हा मूळचा जळगावचा आहे. तो तिसरीच्या वर्गात शिक्षण घेत होता. त्याचे वडील जळगावमध्ये व्यापारी आहेत. उन्हाळ्याची सुटी घालविण्यासाठी तो त्याचे मामा प्रणय प्रकाश शिंगी यांच्याकडे आला होतो. ते वर्धमानपुरा सोसायटीत राहतात. या सोसायटीमध्ये जलतरण तलाव आहे.
क्रिश हा गुरुवारी दुपारी सोसायटीच्या जलतरण तलावात पोहण्यासाठी उतरला. साडेचारच्या सुमारास त्याला पाण्यातच उलटय़ा झाल्या. त्या वेळी तलावात इतर लोकही पोहत होते. त्या ठिकाणी जीवरक्षकही होता. मात्र, हा प्रकार कोणाच्याही लक्षात आला नाही. पाण्यातून बुडबुडे निघत असल्याचे दिसल्याने त्या ठिकाणी काहींचे लक्ष गेले व त्या वेळी मुलगा बुडाल्याचे लक्षात आले. नागरिकांनी तातडीने त्याला बाहेर काढले व शुद्धीवर आणण्याचा प्रयत्न केला. त्याचा उपयोग न झाल्याने त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाला होता.
सोसायटीच्या जलतरण तलावात बुडून आठ वर्षांच्या मुलाचा मृत्यू
मार्केट यार्ड भागातील गंगाधाम सोसायटीजवळील वर्धमानपुरा सोसायटीच्या जलतरण तलावात बुडून एका आठ वर्षे वयाच्या मुलाचा गुरुवारी दुपारी साडेचारच्या सुमारास मृत्यू झाला.
First published on: 16-05-2014 at 03:17 IST
Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: 8 year old childs death in swimming tank