पिंपरी : विधानसभा निवडणुकीसाठी आचारसंहिता लागू झाल्यापासून पिंपरी-चिंचवड पोलिसांनी अवैधरीत्या वाहतूक करीत असलेली ७९ लाख ६६ हजाराची रोकड जप्त केली आहे. तसेच ७८ लाखांचा दारूसाठा, १६ लाखांचा गांजा, १७ लाखांचे अमली पदार्थ (मेफेड्रोन) जप्त करण्यात आले आहे. तसेच १४३८ जणांविरोधात प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली आहे.

हेही वाचा >>> भोसरीत भाजपकडून ‘ऑनलाइन लक्ष्मी दर्शन’?, कोणी केला हा गंभीर आरोप

विधानसभा निवडणूक शांततेत व सुरळीत पार पडावी, यासाठी पिंपरी-चिंचवड पोलीस प्रयत्न करत आहेत. प्रतिबंधात्मक कारवाईसह पोलीस संचलन, नाकाबंदी करण्यात येत आहे. वरिष्ठ अधिकारी हालचालींवर लक्ष ठेवून आहेत. पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत पिंपरी, चिंचवड, भोसरी, मावळ, भोर-वेल्हा-मुळशी, वडगाव शेरी, खेड-आळंदी आदी मतदारसंघांचा भाग येतो. यामध्ये शहरी व ग्रामीण भागाचा समावेश असून, भौगोलिकदृष्ट्याही हद्द खूप मोठी आहे. सराईत गुन्हेगारांंच्या हालचालींवर नजर ठेवण्यात येत आहे. तपासणीकरिता १७ भरारी पथक नेमण्यात आली आहेत. त्यामध्ये ३६ अधिकारी आणि १०२ कर्मचारी आहेत.

हेही वाचा >>> पिंपरीत भाजपपुढे नाराजांची डोकेदुखी; आतापर्यंत १३ माजी नगरसेवकांचे पक्षांतर

पोलीस आयुक्तालय हद्दीत मोठ्या प्रमाणावर प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात येत आहे. आतापर्यंत १४३८ जणांविरुद्ध प्रतिबंधात्मक कारवाई केली आहे. सहा गुन्हेगारी टोळ्यांमधील २८ आरोपींच्या विरुद्ध महाराष्ट्र संघटीत गुन्हेगारी नियंत्रण प्रतिबंधात्मक कायद्याअंतर्गत (मोक्का) कारवाई करण्यात आली आहे. सहा आरोपींना स्थानबद्ध करण्यात आले आहे. विधानसभा निवडणूक शांततेत होण्यासाठी पोलीस यंत्रणा सज्ज आहे. प्रतिबंधात्मक कारवाईचा आराखडा तयार करण्यात आला आहे. सराईत गुन्हेगारांच्या हालचालींवर बारकाईने लक्ष ठेवण्यात येत असल्याचे पिंपरी-चिंचवडचे पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे यांनी सांगितले.

Story img Loader