आपली संस्कृती श्रेष्ठ आहे, असे आपण म्हणतो. प्रत्यक्षात तसे आहे का, असा मुद्दा उपस्थित करत बायकांना सती जाण्याची परंपरा असलेला, जिथे ८० टक्के अक्षरज्ञान नाही, काव्याचा अधिकार दिला जात नाही, तो देश सुसंस्कृत कसा असू शकतो, निदान आपण तसे मानणार नाही, असे प्रतिपादन मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष डॉ. नागनाथ कोत्तापल्ले यांनी चिंचवडला केले. निर्णय घेणाऱ्या सत्ताधारी मंडळींना सामान्यांविषयी आस्था राहिलेली नसते. ८० टक्के कारभारी निर्दयी असतात, त्यांचे स्वहिताकडेच लक्ष असते, असेही ते म्हणाले.
चिंचवडला यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान आयोजित गौरव सोहळ्यात ते बोलत होते. साहित्य संमेलनाचे नियोजित अध्यक्ष फ. मुं. शिंदे, माजी गृहराज्यमंत्री भाई वैद्य, ज्येष्ठ स्वातंत्र्यसैनिक अॅड. रावसाहेब शिंदे, शशिकला शिंदे, पुरुषोत्तम सदाफुले आदी उपस्थित होते. कैलास आवटी व विनोद महाळुंगकर यांना यशवंतराव चव्हाण पुरस्काराने गौरवण्यात आले.
कोत्तापल्ले म्हणाले, भारत महासत्ता आहे, असे चित्र निर्माण केले जाते. मात्र, लाखो नागरिक आजही रस्त्यावर झोपतात. खरी संस्कृती निर्माण गरज आहे, अन्यथा येणारी पिढी क्षमा करणार नाही. रस्तोरस्ती गृहयुद्ध सुरू होतील, त्या पायरीवर आपण येऊन ठेपलो आहोत. चहा पिण्याची ऐपत नसलेला माणूस काय करेल. ३६ मजली इमारतीचे त्याच्या दृष्टीने कौतुक ते काय असेल. सामान्य माणसाला समाधानाने जगता येईल, त्या दृष्टीने प्रयत्न होण्याची गरज आहे. मात्र, सत्ताधारी मंडळींना सामान्यांविषयी कसलीही आस्था नाही, ते निर्दयी असतात. मनुष्याचे वागणे देखील परस्परविरोधी असते. जाहीरपणे तो एक बोलतो, प्रत्यक्षात दुसरेच करतो. दोन्ही बाजूने मतप्रदर्शनही केले जाते, असे ते म्हणाले.
‘संत सज्जनांची भीती वाटते’
या कार्यक्रमात फ. मुं. शिंदे यांनी ‘भीती वाटते’ या आशयाची स्वत:ची आवडती कविता सादर केली. ‘‘एकटेपणाची कधीकधी भीती वाटते,
            कधी सोबतीची भीती वाटते.
            सावलीत बसलेले,
            निजलेले अनोळखी बनले,
            परोपकाराची भीती वाटते.
            चांगभल म्हणताना, तळी उचलताना भीती वाटते.
            तनाचे, कीर्तनाचे, केवढे व्यापार खुले.
            संतसंज्जनांची भीती वाटते.’’

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा