करोना रुग्णसंख्या कमी होत असल्याचं चित्र दिसत असतानाच करोनाचा नवा व्हेरिएंट ओमायक्रॉनने डोकं वर काढलं. त्यामुळे प्रशासनाची चिंता चांगलीच वाढली. काल राज्यात ५० नवे ओमायक्रॉन बाधित आढळून आले, त्यापैकी ३६ ओमायक्रॉन बाधित रुग्ण एकट्या पुण्यात आढळून आले आहेत. त्यामुळे पुणे महानगरपालिका आता सतर्क झाली आहे.
नुकतीच पुणे महापालिकेची करोना आढावा बैठक पार पडली. त्यात करोना प्रतिबंधक लसीचे दोन्ही डोस घेतलेले ८० टक्के लोक करोनाबाधित आढळत आहेत, असं दिसत असल्याचं समोर आले आहे. २७ डिसेंबर ते १ जानेवारी या काळात पुण्यात रुग्णसंख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. गेल्या आठ दिवसात पुण्यात उपचाराधीन रुग्णांची संख्या तब्बल चारपटीने वाढल्याचं समजत आहे. नव्याने बाधित झालेल्यांपैकी लसीकरण झालेल्यांची माहिती घेतली जात असून ८० टक्के बाधित लोकांनी दोन्ही डोस घेतले असल्याचं महापौर मुरलीधर मोहोळ यांनी आढावा बैठकीत सांगितलं आहे. गेल्या ८ दिवसात वाढलेल्या रुग्ण संख्येचा आढावा घेतल्याचं त्यांनी सांगितलं असून महापालिका सतर्क आणि सज्ज असल्याचंही महापौर मुरलीधर मोहोळ यांनी म्हटलं आहे.
निर्बंधांची कडक अंमलबजावणी करण्याचा निर्णय घेण्यात येणार असून विलगीकरणासाठी पुन्हा हॅाटेल सुरु करणार असल्याचंही ते म्हणाले. तसंच लसीकरण राहिलेल्या लोकांपर्यंत तातडीने पोहोचण्यासाठी प्राधान्याने प्रयत्न केला जाणार असल्याचंही महापौर मुरलीधर मोहोळ यांनी म्हटलं आहे.
रविवारी राज्यात नवे ओमायक्रॉन बाधित आढळून आले . या ५० रुग्णांपैकी ३६ रुग्ण एकट्या पुण्यातले आहेत. तर राज्यात ओमायक्रॉन बाधितांची संख्या ५१० वर पोहोचली आहे. पुणे महापालिकेच्या हद्दीत सर्वाधिक ३६ रुग्ण आढळले आहे. तर पिंपरी चिंचवडमध्ये ८, पुणे ग्रामीण २ रुग्ण आढळले आहेत.