पुण्यातील हडपसर भागात सीमाशुल्क विभागाच्या पथकाने आजवरची सर्वात मोठी कारवाई करीत तब्बल ८०० किलो गांजा जप्त केला आहे. एक कंटेनर गांजा घेऊन पुण्याकडे येत असल्याची माहिती सीमाशुल्क विभागाच्या अंमली पदार्थविरोधी पथकाला मिळाली होती. त्यानुसार बुधवारी सकाळी ही कारवाई करण्यात आली. याप्रकरणी दोन जणांना ताब्यात घेण्यात आले आहे.
पोलिसांच्या माहितीनुसार, ओडिशा राज्यातून मुंबईकडे एक कंटनेर मोठ्या प्रमाणावर गांजा घेऊन चालला असल्याची अंमली पदार्थ विरोधी पथकाच्या अधिकाऱ्यांना मिळाली होती. मिळालेल्या माहितीनुसार हडपसर येथे सापळा रचण्यात आला. संबंधीत कंटनेर येथे दाखल होताच त्याला थांबवून झडती घेतल्यानंतर त्यात पोत्यांमध्ये भरलेला तब्बल ८०३ किलो गांजा आढळून आला. याची किंमत ७० लाख रुपये आहे.
हा गांजा जप्त करीत बाबू सिंग (वय ३०, राजस्थान) आणि शैलेश राव (वय २६, ओडिशा) या दोघांना पोलिसांनी ताब्यात घेतले. पुण्यातली हीसर्वांत मोठी अंमली पदार्थ जप्तीची कारवाई असल्याचे सांगण्यात येत आहे.