पुणे : वयाच्या ८० व्या वर्षी त्यांनी मनाशी एक स्वप्न बांधले, पुढील एका वर्षांत छत्रपती शिवरायांचे ८१ किल्ले चढायचे, पाहायचे. शिवजन्मस्थान शिवनेरीवर गेल्या वर्षी ३१ ऑक्टबर रोजी त्यांनी या मोहिमेचा प्रारंभ केला आणि एकेक दुर्ग सर करत बरोबर वर्षभराने म् ३० ऑक्टबर रोजी ८१ व्या वाढदिवशी रायगडावर माथा टेकवत ‘८१ व्या वर्षांत ८१ किल्ले’ हे स्वप्न सत्यात आणले. एखादा जातीच्या गिर्यारोहकालाही आव्हान देईल, अशा अचाट जिद्दीची ही कहाणी रचली आहे पुण्यातील अरविंद दीक्षित या ८१ वर्षांच्या ‘तरुणा’ने!

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हेही वाचा >>> अक्षय कुमार साकारणार छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका; CM शिंदे, राज ठाकरेंच्या उपस्थित चित्रपटाची घोषणा

भारतीय नौदलातील निवृत्त अधिकारी आणि दिल्लीतील विश्व विद्यालयाचे निवृत्त प्राध्यापक असलेले दीक्षित यांना वाचन, लेखन, भ्रमण, व्यायाम, चित्रपट, नाटक, संगीत, विविध खेळांची सुरुवातीपासून आवड. चालणे, पोहणे, सायकिलग सोबतच सह्याद्री आणि हिमालयात भटकंती हे त्यांचे तर आवडीचे छंद. या साऱ्यातून त्यांनी आजवर शरीर आणि मन दोन्हीची तंदुरुस्ती, ऊर्जा कमावली आहे. या जीवनशैलीतील सकारात्मकतेशी भोवतीचा समाजही जोडून घ्यावा या हेतूने त्यांनी वयाच्या पंचाहत्तरीपासून एका आगळय़ा वेगळय़ा उपक्रमाला सुरुवात केली. दरवर्षीचा वाढदिवस अशाच तन मनाच्या तंदुरुस्तीचा संदेश देणाऱ्या एखाद्या उपक्रमाने साजरा करायचा आणि त्यातील उत्साह, ऊर्जेची पेरणी भोवतीच्या समाजात देखील करायची. मग त्यांच्याकडून एकेक अध्याय रचत गेले. पंचाहत्तरीवेळी ७५ किलोमिटर चालणे, ७६ व्या वर्षी व्यायामाचे ७६ धडे, ७७ च्या टप्प्यावर तेवढे अंतर सायकल चालवणे. पुढे करोनामुळे खंड पडल्यावर ८० च्या उंबरठय़ावर त्यांच्या संकुलातील सर्व इमारतींचे सर्व मजले एका दमात ८० वेळा वरखाली करणे. दर वर्षीचा वाढदिवस असा वैशिष्टय़ घेऊन येऊ लागला.

हेही वाचा >>> “वेडात मराठे वीर दौडले चाळीस”; राज ठाकरेंची मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंसमोर मिश्कील टिप्पणी

याच मालिकेत त्यांनी यंदा ८१ वर्षांच्या तपपूर्तीला एका वर्षांत तब्बल ८१ किल्ले चढायचे, पाहायचे असे स्वप्न बांधले. त्यांचे वय आणि वर्षांत ८१ किल्ले हा संकल्प लक्षात घेता अनेक गिर्यारोहकांनी देखील या आव्हानाबद्दल साशंकता व्यक्त केली. पण दीक्षितांना त्यांच्या इच्छाशक्तीवर विश्वास होता. त्यांनी किल्ल्यांची यादी, क्रम, काळ वेळ, तयारी असे करत बरोबर ८० व्या वाढदिवसाच्या दुसऱ्याच दिवशी ३१ ऑक्टोबर रोजी या दिग्विजय मोहिमेचा प्रारंभ केला. शिवजन्मस्थान शिवनेरीवर या मोहिमेचे तोरण बांधले गेले आणि पाहता पाहता एकेक गड सर होत गेला. सिंहगड, पुरंदर, तोरणा, राजगड, लोहगड, विसापूर, राजमाची, तुंग, तिकोना, सज्जनगड, अजिंक्यतारा, पन्हाळा, गोपाळगड, कुलाबा, अर्नाळा असे एकेक दुर्ग करत बरोबर यंदा ३० ऑक्टोबर रोजी रायगडावर माथा टेकवत त्यांनी आपला संकल्प पूर्ण केला. ‘८१ व्या वर्षांत ८१ किल्ले हे स्वप्न सत्यात आणले !

या स्वप्नपूर्तिवेळी मित्र, नातेवाईक, गिर्यारोहक आणि गडावर आलेल्या दुर्गप्रेमींसोबत त्यांनी गड चढला. रायगडाच्या महा दरवाजात त्यांनी माथा टेकवताच घोषणा देण्यात आल्या. पुढे गडावर महाराजांच्या पुतळय़ाच्या साक्षीने दीक्षितांनी या मोहिमेतील राष्ट्रध्वज आणि भगवा फडकवताच त्यांच्यावर फुलांची उधळण करण्यात आली. छत्रपती शिवराय आणि भारत मातेच्या घोषणांनी रायगड दुमदुमून गेला !

माझा जन्म, शिक्षण जरी महाराष्ट्रात झाले असले तरी पुढील सबंध आयुष्य दिल्लीत गेले. शिवरायांचे हे गड पहावेत, अनुभवावेत अशी खूप इच्छा होती. त्यासाठीच हा संकल्प केला. शरीरमनाच्या तंदुरुस्तीवर तो पूर्णत्वासही नेता आला. आमचे हे गडकोट ज्वलंत इतिहासाची धारातीर्थ आहेत. त्यांची वारी, दर्शनातून जगण्याची नवी ऊर्जा मिळत असते. – अरविंद दीक्षित

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: 81 years old arvind dixit from pune climbed 81 forts of chhatrapati shivaji maharaj zws