आगामी ८७ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनासाठी पिंपरी-चिंचवड आणि सासवड अशी दोनच निमंत्रणे आल्यामुळे अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाच्या पदाधिकाऱ्यांपुढे यंदा सोपी प्रश्नपत्रिका आली आहे. सासवड आणि पिंपरी-चिंचवड ही दोन्ही ठिकाणे पुणे जिल्ह्य़ातच असल्यामुळे पुणे शहरातील ८३ व्या संमेलनानंतर चार वर्षांनी पुन्हा पुण्यातच साहित्य संमेलन भरणार हे निश्चित झाले आहे.
अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे कार्यालय एक एप्रिलपासून आगामी तीन वर्षांसाठी मुंबई मराठी साहित्य संघाकडून पुण्यातील महाराष्ट्र साहित्य परिषदेकडे आले आहे. त्यामुळे आगामी तीन साहित्य संमेलनांच्या स्थळांविषयीचा अधिकार आता पुण्याकडे आला आहे. साहित्य महामंडळाच्या घटनेनुसार ८७ व्या साहित्य संमेलनासाठी निमंत्रण साहित्य महामंडळाकडे पाठविण्याची ३१ मार्च ही अंतिम मुदत होती. या कालावधीत सासवड आणि पिंपरी-चिंचवड अशी दोन निमंत्रणे साहित्य महामंडळाकडे पोहोचली आहेत. त्यामुळे या दोनपैकी एका ठिकाणी आगामी साहित्य संमेलन होणार हे निश्चित झाले आहे. आता साहित्य महामंडळाच्या आगामी बैठकीमध्ये संमेलन स्थळ निवड समिती निमंत्रण आलेल्या ठिकाणांना भेट देऊन याबाबतचा अहवाल साहित्य महामंडळाकडे सादर करेल. त्यानंतरच आगामी साहित्य संमेलनाच्या स्थळाची घोषणा होणार आहे.
यापूर्वी पुण्यभूषण फाऊंडेशनतर्फे स. प. महाविद्यालयाच्या मैदानावर ८३वे साहित्य संमेलन भरविण्यात आले होते. विदांचे हात हातात घेऊन ज्येष्ठ कवी ना. धों. महानोर यांनी केलेले संमेलनाचे उद्घाटन, ज्येष्ठ समीक्षक डॉ. द. भि. कुलकर्णी यांचे अध्यक्षीय भाषण, ‘बिग बी’ अमिताभ बच्चन आणि ज्ञानपीठ पुस्कारविजेते ज्येष्ठ संस्कृत साहित्यिक सत्यव्रत शास्त्री यांच्या उपस्थितीत झालेला संमेलनाचा समारोप या वैशिष्टय़ांबरोबरच निधिसंकलनाच्या मुद्यावरून हे संमेलन गाजले होते. त्यानंतर आता उपनगर असलेले पिंपरी-चिंचवड किंवा हडपसरपासून अध्र्या तासाच्या अंतरावर असलेले सासवड यापैकी एकाची निवड होणार असल्याने पुन्हा एकदा पुण्यातच हे संमेलन होणार आहे. सासवड येथील आचार्य अत्रे विकास प्रतिष्ठानने, तर पिंपरी-चिंचवड परिसरातील १२५ लेखक-कवींनी एकमुखी मागणीचे निवेदन असलेले निमंत्रण साहित्य महामंडळाला दिले आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा