पुणे – जुन्या निवृत्ती वेतनाची मागणी करत राज्य सरकारी कर्मचाऱ्यांनी पुकारलेल्या संपामध्ये ससून सर्वोपचार रुग्णालयाचे सुमारे ९० टक्के कर्मचारी सहभागी झाले आहेत. मात्र, निवासी डॅाक्टरांच्या मार्ड (महाराष्ट्र असोसिएशन ऑफ रेसिडेंट डॉक्टर्स) या संघटनेच्या डॉक्टरांकडून अत्यावश्यक वैद्यकीय सुविधा सुरू ठेवण्यात आल्या आहेत.
बाह्यरुग्ण विभागातील रुग्णांची कमीत कमी गैरसोय व्हावी यादृष्टीने प्रयत्नशील असल्याचे ससून रुग्णालयातील मार्डच्या डॉक्टरांकडून स्पष्ट करण्यात आले आहे. रुग्णालयाच्या बै.जी. शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांकडून रुग्णालयातील सर्व प्रकारच्या अत्यावश्यक सेवा सुरू ठेवण्यात आल्या आहेत. रुग्ण किंवा त्यांच्या कुटुबियांचे हाल होऊ नयेत, अशी काळजी घेतली जात असल्याचे रुग्णालयातील डॉक्टरांकडून सांगण्यात येत आहे.