सिंहगड रस्त्यावरील सहा सोसायटय़ांच्या पार्किंगमध्ये लावलेली तब्बल ९० वाहने जाळून टाकण्याचा धक्कादायक प्रकार रविवारी पहाटे घडला. सहाही सोसायटय़ांमध्ये वाहनांना आग लावणारा एकच व्यक्ती असल्याचे सीसीटीव्हीच्या चित्रीकरणातून स्पष्ट झाले आहे.
या विकृत प्रकारामध्ये सुमारे ८० दुचाकी, आठ ते दहा मोटारी व सात सायकली जळाल्या. या प्रकारामागील कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. सीसीटीव्ही चित्रीकरणाच्या आधारे पोलिसांकडून आग लावणाऱ्याचा शोध घेण्यात येत आहे. या घटनेमुळे परिसरामध्ये घबराटीचे वातावरण निर्माण झाले आहे. सिंहगड रस्त्यावरील सनसिटी रस्त्यावरील सूर्यानगरी बिल्डींग, अक्षय ग्लोरी अपार्टमेन्ट, अवधूत आर्केट, स्वामी नारायण अपार्टमेन्टची ए व बी विंग, नऱ्हेतील राम हाईट या पाच सोसायटय़ांमधील ९० वाहने जाळण्यात आली आहेत. घटनेची माहिती मिळताच अग्निशामक दलाने घटनास्थळी पोहोचून आग आटोक्यात आणली. याबाबत प्रशांत बढे यांनी सिंहगड रोड पोलिसांकडे तक्रार दिली आहे. पहाटे तीन ते साडेतीनच्या दरम्यान अज्ञात व्यक्तीने ही आग लावली. या घटनेत ५० लाखांचे नुकसान झाले आहे.
याबाबत पोलीस उपायुक्त डॉ. सुधाकर पठारे यांनी सांगितले, सहाही ठिकाणी वाहने जाळणारी व्यक्ती एकच असून त्याने पेट्रोलचा पाईप काढून वाहनांना आग लावली आहे.

Story img Loader