शिवाजीनगर येथील श्री शिवाजी प्रिपरेटरी मिलिटरी स्कूलच्या (एसएसपीएमएस) आवारातील छत्रपती शिवाजी महाराज यांचा अश्वारूढ पुतळा शुक्रवारी (१६ जून) ९० व्या वर्षांत पदार्पण करीत आहे. छत्रपती राजर्षी शाहू महाराज यांच्या सूचनेनुसार ज्येष्ठ शिल्पकार विनायक करमरकर यांनी संपूर्ण ओतीव काम करून ब्राँझमध्ये घडविलेला हा पुतळा भारतामध्ये सवरेत्कृष्ट मानला जातो.
छत्रपती शिवाजी महाराज यांच्या या देखण्या पुतळ्याची कहाणी तितकीच रोमहर्षक आहे. पुण्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा अश्वारूढ पुतळा असावा, अशी छत्रपती राजर्षी शाहू महाराज यांची इच्छा होती. त्यासाठी त्यांनी म्हात्रे नावाच्या शिल्पकाराला पाचारण केले होते. मात्र, काही कारणांनी म्हात्रे यांच्याकडून हे काम होऊ शकले नाही. त्यामुळे शाहू महाराजांनी ज्येष्ठ शिल्पकार विनायक करमरकर यांना निमंत्रित केले होते. करमरकर यांनी मुंबई येथे हा अश्वारूढ पुतळा घडविला. हा पुतळा संपूर्णपणे ओतीव काम करून ब्राँझमध्ये घडविण्यात आला आहे. हा पुतळा मुंबईहून रेल्वेने पुण्यात आणण्यात आला होता. त्या वेळी रेल्वेला एक खास डबा जोडून त्याद्वारे हा पुतळा पुण्यामध्ये दाखल झाला. रेल्वेच्या प्रवासात खंडाळ्याच्या घाटामध्ये सर्वात कमी उंचीचा बोगदा आहे, त्या बोगद्यापेक्षा या पुतळ्याची उंची जेमतेम तीन-चार इंच कमी होती. त्यामुळे हा पुतळा अगदी काळजीपूर्वक पण सहीसलामत पुण्यामध्ये येऊ शकला. एसएसपीएमएस
शाळेच्या आवारात १६ जून १९२८ रोजी या अश्वारूढ पुतळ्याचे अनावरण करण्यात आले होते, अशी माहिती ज्येष्ठ इतिहास संशोधक पांडुरंग बलकवडे यांनी दिली.
शिल्पकार विनायक करमरकर हे मूळचे कोकणातील अलिबागजवळील सासवणे गावचे. आपल्या आयुष्यात त्यांनी अनेक शिल्पे घडविली असली तरी छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्याचे निर्माते हीच त्यांची ओळख प्रस्थापित झाली होती.