पुणे : मोसमी पावसाचे आगमन यंदा लवकर झाले आहे. या पार्श्वभूमीवर जलसंपदा विभागाने कृष्णा खोरे विकास महामंडळातील सर्व प्रकारच्या छोट्या, मध्यम आणि मोठ्या अशा सुमारे ९०० धरणांची सुरक्षितता तपासली आहे. त्यानुसार या धरणांची स्थिती मजबूत आहे. केवळ किरकोळ दुरुस्तीसह विविध उपाययोजना पूर्ण करण्यात आल्याचे जलसंपदा विभागाकडून सांगण्यात आले.

जलसंपदा विभागाच्या पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर दरवर्षी सर्व प्रकारच्या धरणांच्या सुरक्षिततेची तपासणी केली जाते. यंदा देखील ही तपासणी करण्यात आली आहे. धरणांची तपासणी तांत्रिक कर्मचाऱ्यांकडून करण्यात येते. त्यामध्ये धरणाचे दरवाजे उघडतात का? ग्रिसिंग, ऑइलिंग करण्याची गरज आहे का? धरणाचे दरवाजे व्यवस्थित आहेत का? ज्या ठिकाणी त्रुटी आढळल्या त्या ठिकाणी किरकोळ दुरुस्ती करण्यात आल्या आहेत. पावसाचा अंदाज पाहून धरणात येणाऱ्या पाण्यावर लक्ष केंद्रित करण्यासाठी जलसंपदा विभागाने नियोजन केले आहे. त्यामुळे आतापासून पावसाचा अंदाज काय आहे, कोणत्या भागात पाऊस किती पडेल, धरणात पावसाची स्थिती काय आहे याचा अंदाज बांधून नदीला पूर येऊ शकतो का? तसे असेल तर नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देणे, पूरस्थितीचा फटका बसणाऱ्या नागरिकांचे स्थलांतर करणे, त्यासाठी जिल्हा प्रशासनाशी समन्वय साधणे यासारख्या जबाबदाऱ्या पार पाडण्यासाठी जलसंपदा विभाग सज्ज झाला आहे, असे जलसंपदा पुणे विभागाचे मुख्य अभियंता हनुमंत गुणाले यांनी सांगितले.

हेही वाचा : भाजपसाठी कोथरूड नवे ‘सत्ताकेंद्र’, ‘कसब्या’ची मक्तेदारी संपुष्टात

धरणांची तपासणी कशी होते?

पावसाळ्यापूर्वी ३१ मेपर्यंत धरणांची तपासणी होते. त्यानंतर पावसाळ्यानंतरही तपासणी होते. ही तपासणी म्हणजेच धरणांचे स्थापत्यविषयक लेखापरीक्षण ऑक्टोबर ते नोव्हेंबर महिन्यात करावे लागते. या अहवालावरच धरणांतील पाणीसाठयाचे नियोजन केले जाते. जलसंपदाकडील धरण सुरक्षा संस्था नावाच्या विभागाकडे धरणांची यादी असते. त्यानुसार दरवर्षी ते ठराविक धरणांची तपासणी करतात. तपासणी करताना प्रामुख्याने धरणातील गळती मोजणे, सांडवा, धरणाचे वरील आणि खालील पिचिंग, दरवाजे कार्यरत आहेत किंवा कसे, देखभाल-दुरुस्ती आणि याबाबत केलेल्या नोंदीनुसार कामे झाली आहेत किंवा कसे, वीजपुरवठा, जनरेटरची सुविधा अशा विविध घटकांची तपासणी होते.

हेही वाचा : लष्कराच्या दक्षिण मुख्यालयाने निश्चित केले महत्त्वाचे उद्दिष्ट;  २०४७ पर्यंत काय साध्य करणार?

ड्रिप प्रकल्पांतर्गत धरणांची दुरुस्ती

देशभरातील धरणांच्या देखभाल, दुरुस्तीच्या कामांसाठी धरणे पुनर्वसन आणि सुधारणा प्रकल्पामध्ये (डॅम रिहॅबिलिटेशन अॅण्ड इम्प्रुव्हमेंट प्रोजेक्ट – डीआरआयपी) पश्चिम महाराष्ट्रातील उजनी (सोलापूर), डिंभे आणि भाटघर (पुणे), राधानगरी (कोल्हापूर), महिंद, कोयना, धोम, कन्हेर (सातारा) यांचा समावेश आहे. या धरणांच्या दुरुस्तीसाठी जागतिक बँकेकडून निधी मिळणार आहे.