लोकसत्ता प्रतिनिधी

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

पुणे: खडकवासला धरणसाखळी प्रकल्पातील चारही धरणांच्या पाणलोट क्षेत्रांत गेल्या काही दिवसांपासून पाऊस ओसरला आहे. दिवसभरात पावसाने उघडीप दिली. धरणांच्या परिसरात कमी-अधिक प्रमाणात होत असलेल्या पावसामुळे एकूण पाणीसाठा ९१ टक्क्यांवर पोहोचला आहे. पानशेत धरण १०० टक्के भरल्याने या धरणातून आंबी नदीत पाणी सोडण्यात येत आहे.

शहराला टेमघर, वरसगाव, पानशेत आणि खडकवासला या चार धरणांमधून पाणीपुरवठा केला जातो. या चारही धरणांत मिळून एकूण २६.४८ अब्ज घनफूट (टीएमसी) म्हणजेच ९०.८५ टक्के पाणीसाठा जमा झाला आहे. दिवसभरात टेमघर आणि खडकवासला धरणांच्या पाणलोट क्षेत्रात पावसाने विश्रांती घेतली, तर वरसगाव आणि पानशेत धरणांच्या परिसरात अनुक्रमे तीन मिलिमीटर आणि एक मि.मी. पावसाची नोंद करण्यात आली. सध्या टेमघर धरणात २.६६ टीएमसी (७१.६३ टक्के), वरसगाव धरणात ११.७३ टीएमसी (९१.४७ टक्के), पानशेत धरणात १०.६५ टीएमसी (१०० टक्के) आणि खडकवासला धरणात १.४५ टीएमसी (७३.५३ टक्के) पाणीसाठा जमा झाला आहे.

हेही वाचा… भूगाव बाह्यवळण मार्गाचे काम सुकर; जागामालकांची जमिनी देण्यास सहमती

दरम्यान, पिंपरी-चिंचवड शहर आणि परिसराला पाणीपुरवठा करणाऱ्या पवना धरण परिसरात दिवसभरात २७ मि.मी. पावसाची नोंद करण्यात आली. सध्या या धरणात ८.२० टीएमसी (९६.३६ टक्के) पाणीसाठा जमा झाला आहे. जिल्ह्याच्या इतर धरणांपैकी कळमोडी, चासकमान, वडीवळे, आंद्रा, कासारसाई, नीरा देवघर, भाटघर, वीर या धरणांमध्ये समाधानकारक पाणीसाठा जमा झाला आहे. जिल्ह्याच्या सीमेवरील उजनी धरणात केवळ ७.०८ टीएमसी (१३.२२ टक्के) पाणीसाठा जमा झाला आहे. पुणे जिल्ह्यातील धरणांमधून अद्याप मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग झाला नसल्याने उजनी धरणात अत्यल्प पाणीसाठा जमा झाल्याचे निरीक्षण जलसंपदा विभागाकडून नोंदविण्यात आले.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: 91 percent water storage in dams in pune panshet dam is 100 percent full pune print news psg 17 dvr