पुणे : एका ९२ वर्षीय वृद्धाने मूत्रपिंडाच्या कर्करोगावर मात केली आहे. या रुग्णावर रोबोटिक शस्त्रक्रिया करून त्याच्या मूत्रपिंडातील गाठ काढण्यात आली. डॉक्टरांनी शस्त्रक्रियेसाठी अत्याधुनिक उपचार पद्धतींचा अवलंब केल्याने रुग्णाला केवळ चार दिवसांत रुग्णालयातून घरी सोडण्यात आले.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

पुण्यातील एस हॉस्पिटलमध्ये ही रोबोटिक शस्त्रक्रिया करण्यात आली. मूत्रविकारतज्ज्ञ प्रा. डॉ. सुरेश पाटणकर यांच्या नेतृत्वाखाली डॉ. गुरुराज पडसलगी, डॉ. मयूर नारखेडे, डॉ. सचिन भुजबळ यांच्या पथकाने ही शस्त्रक्रिया केली. या शस्त्रक्रियेबाबत एस हॉस्पिटलचे अध्यक्ष डॉ. सुरेश पाटणकर म्हणाले, की एक महिन्यापूर्वी ९२ वर्षांचा एक रुग्ण आमच्याकडे आला होता. तेव्हा त्याला पोटात तीव्र वेदना होत होत्या आणि लघवीतून रक्त येत होते. नियमित तपासणी, सीटी स्कॅन आणि पेट स्कॅन केल्यानंतर उजव्या मूत्रपिंडात कर्करोगातील गाठीचे निदान झाले. मूत्रपिंडाच्या आकाराच्या दोन तृतीयांश भाग गाठीने व्यापला होता. त्या वेळी दुसऱ्या टप्प्यातील कर्करोग असल्याचे निदान झाले.

आणखी वाचा-सिंहगड रस्त्यावर कोयत्याच्या धाकाने ५० हजारांची लूट

डॉक्टरांसमोर सुरुवातीला लॅप्रोस्कोपिक शस्त्रक्रिया आणि रोबोटिक शस्त्रक्रिया हे दोन पर्याय होते. रुग्णाची वैद्यकीय स्थिती आणि वय विचारात घेऊन रोबोटिक शस्त्रक्रिया करण्याचा निर्णय घेण्यात आला. रुग्णाचे वय जास्त असल्याने त्याच्यावर शस्त्रक्रिया करणे आव्हानात्मक होते. कुशल शल्यचिकित्सक आणि रोबोटिक उपकरणांच्या साह्यामुळे ही प्रक्रिया शक्य झाली. रोबोटिक शस्त्रक्रिया केल्याने रुग्ण लवकर बरा होण्यासही मदत झाली. त्याला शस्त्रक्रियेनंतर चार दिवसांत रुग्णालयातून घरी सोडण्यात आले. अद्ययावत तंत्रज्ञान व अत्याधुनिक सुविधांसह लवकर निदान आणि वेळेवर उपचार केल्याने कर्करोग बरा होऊ शकतो, असे डॉ. पाटणकर यांनी सांगितले.

आणखी वाचा-आवक वाढल्याने कांदा, टोमॅटो, फ्लॉवरच्या दरात घट

लॅप्रोस्कोपिक तंत्राच्या तुलनेत रोबोटिक शस्त्रक्रियेचे अनेक फायदे आहेत. यामध्ये अचूकता, कमीत कमी छेद, अधिक सुस्पष्ट प्रतिमा, मशिनची अधिक कार्यक्षम हालचाल, कमीत कमी रक्तस्राव, रुग्णालयातील कमी मुक्काम, संसर्गाचा धोका कमी असणे आणि शल्यचिकित्सकांसाठी सुधारित कार्यपद्धती यांचा समावेश आहे. -डॉ. सुरेश पाटणकर, मूत्रविकारतज्ज्ञ

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: 92 year old man beats kidney cancer by robotic surgery pune print news stj 05 mrj