दहा वर्षांत लिंग गुणोत्तरात ५८ ने वाढ; ६८६ गावांत हजार मुलांमागे ९४८ मुली
पुणे : जिल्ह्याच्या ग्रामीण भागात शून्य ते सहा वयोगटातील मुलांमध्ये एक हजार मुलांमागे ९४१ मुली असल्याचे लिंग गुणोत्तरात स्पष्ट झाले आहे. सन २०११ च्या जनगणनेनुसार जिल्ह्यात प्रत्येक एक हजार मुलांमागे ८८३ मुली असल्याची नोंद होती. जैविक मानकांनुसार प्रत्येक एक हजार मुलांमागे ९४० ते ९५० मुली असणे आवश्यक आहे. त्यानुसार सध्या जिल्ह्यात हजार मुलांमागे ९४१ मुली असल्याचे आकडेवारीमधून समोर आले आहे. दरम्यान, अद्यापही जिल्ह्यातील ५७५ गावे लाल श्रेणीत असून या ठिकाणी एक हजार मुलांमागे मुलींचे प्रमाण ९१२ एवढे आहे.
पुणे जिल्हा परिषदेने बाल आरोग्य तपासणी कार्यक्रम आयोजित केला आहे. त्या अंतर्गत मुलांची नावे आणि आरोग्याबाबत नोंदी करण्यात आल्या आहेत. प्रत्येक मुलाची समुदाय आरोग्य अधिकाऱ्यांनी आरोग्य तपासणी केली आहे. बालकाचे नाव आणि ३६ अत्यावश्यक बालवैज्ञानिक मापदंडानुसार आरोग्य विषयक माहिती संकलित करण्यात आली आहे. तपासणीच्या पहिल्या फेरीत तीन लाख २८ हजार मुलांची नोंद करण्यात आली. संकलित झालेल्या माहितीचे विश्लेषण करण्यात आले असून, त्यामध्ये बाल लिंग गुणोत्तर ३१ जानेवारी २०२२ पर्यंत शून्य ते सहा वयोगटातील दोन लाख ८५ हजार १७४ मुले आहेत. यामध्ये अंगणवाडी, खासगी शाळा, घरातील, शाळा इत्यादी मुलांचा समावेश आहे. पुणे महानगरपालिकेत समाविष्ट झालेल्या २१ ग्रामपंचायतींमध्ये पुणे जिल्हा परिषद अजूनही आरोग्य सेवा पुरवत आहे. या गावांतील सर्व मुलांसाठी आरोग्य तपासणी करण्यात आली आहे, मात्र बाल लिंगगुणोत्तर केवळ ग्रामीण भागातील मुलांचेच नोंदवण्यात आले आहे, अशी माहिती जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद यांनी दिली.
दरम्यान, बाल आरोग्य तपासणीतील आरोग्य नोंदी तयार करण्यात येत आहेत. त्यामुळे बालमृत्यू कमी होण्यास मदत होणार आहे. जन्मानंतर ३० दिवसांच्या आत डिजिटल जन्म प्रमाणपत्रे आणि जन्मानंतर चार दिवसांच्या आत आधार कार्ड देण्याचे प्रयत्न केले जात आहेत. गर्भधारणापूर्व आणि प्रसवपूर्व निदानतंत्र लिंग निवडीस प्रतिबंध कायद्याची प्रभावीपणे अंमलबजावणी करण्यासाठी
पोलीस विभाग सक्रिय पावले उचलत आहे. याबाबत बेकायदा कृतींबाबत माहिती गोळा करण्यासाठी लवकरच पोलीस पाटलांना आदेश दिले जाणार आहेत, असेही आयुष प्रसाद यांनी स्पष्ट केले.
तीन श्रेणींमध्ये विभागणी
लिंग गुणोत्तरात जिल्ह्यातील गावे तीन श्रेणींमध्ये विभागण्यात आली आहेत. त्यात गावांचे बाल लिंगगुणोत्तर ९४९ किंवा त्याहून अधिक आहे अशी ६८६ गावे हिरव्या श्रेणीत, ९१२ ते ९४८ बाल लिंगगुणोत्तर असलेली गावे नारंगी श्रेणीत, तर ९१२ पेक्षा कमी बाल लिंगगुणोत्तर असलेली ५७५ गावे लाल श्रेणीत टाकण्यात आली आहेत.
तालुकानिहाय लाल-नारंगी- हिरव्या श्रेणीची गावे क्रमानुसार
आंबेगाव ४६-८-५०, बारामती ३८-९-५१, भोर ३९-९-१०४, दौंड ४०-१०-३०, हवेली ३७-१०-२४, इंदापूर ४८-७-६०, जुन्नर ५९-११-७४, खेड ६४-७-९१, मावळ ५१-८-४५, पुरंदर ३३-८-४६, पुरंदर ४४-८-४१, शिरूर ५७-१३-२५, वेल्हा १९-३-४५