पुणे : संकटे येत असली, तरी आपली जबाबदारी पार पाडण्यासाठी लोक सहकार्य करतात. मराठवाड्याच्या काही गावांमध्ये भीती आणि दहशतीचे वातावरण आहे. या संदर्भात माझी मुख्यमंत्र्यांशी सविस्तर चर्चा झाली. महाराष्ट्र पूर्वपदावर आणण्याची जबाबदारी एकट्या मुख्यमंत्र्यांची नाही, तर आपल्या सर्वांची आहे. त्यासाठी साहित्यिकांची लेखणी उपयुक्त ठरेल, अशी अपेक्षा ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी शनिवारी व्यक्त केली.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

सरहद, पुणे आणि महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या वतीने दिल्ली येथे होणाऱ्या ९८ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे स्वागताध्यक्ष शरद पवार यांचा साहित्यिकांशी संवाद कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. त्या वेळी ते बोलत होते. परिषदेचे अध्यक्ष डॉ. रावसाहेब कसबे यांच्या हस्ते पवार यांचा सत्कार करण्यात आला. घुमान येथे झालेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष डॉ. सदानंद मोरे, परिषदेच्या विश्वस्त मंडळाचे अध्यक्ष डॉ. शिवाजीराव कदम, कार्याध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी, प्रमुख कार्यवाह सुनीताराजे पवार, कोषाध्यक्ष विनोद कुलकर्णी, सरहद संस्थेचे संजय नहार आणि शैलेश वाडेकर या वेळी उपस्थित होते. यानिमित्ताने पवार यांनी पहिल्यांदाच महाराष्ट्र साहित्य परिषदेला भेट दिली.

हेही वाचा >>> बारामतीत कार्यक्रमाच्या निमंत्रणावरून नाराजी नाट्य; खासदार सुप्रिया सुळे यांचे मुख्यमंत्र्यांना पत्र

पवार म्हणाले, ‘किल्लारीचा भूकंप, मुंबईतील बॉम्बस्फोटानंतर उसळलेली दंगल, मराठवाडा विद्यापीठाचा नामविस्तार या काळात महाराष्ट्रात उद्भवलेली परिस्थिती हाताळताना साद दिली, की लोक साथ देतात हे मराठी मंडळींचे वैशिष्ट्य प्रकर्षाने जाणवले. सध्या महाराष्ट्रात दहशत, भीतीचे वातावरण आहे. अशा काळात मराठी बांधवांमध्ये ऐक्य राहणे गरजेचे आहे. यातून महाराष्ट्राची स्थिती लवकरच पूर्वपदावर येईल. आपल्या लेखणीच्या माध्यमातून महाराष्ट्राला या संकटकाळातून बाहेर काढण्यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे.’

देशाच्या राजधानीत अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन व्हावे, ही महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातील साहित्यप्रेमींची इच्छा पूर्ण होणार आहे. या साहित्य संमेलनामुळे मराठी भाषेचा सुगंध देशाच्या कानाकोपऱ्यात दरवळेल. राजधानीत होणारे हे संमेलन आगळेवेगळे ठरेल, असा विश्वास पवार यांनी व्यक्त केला. संमेलन होत असलेल्या तालकटोरा स्थळाचे ऐतिहासिक महत्त्व सांगताना पवार म्हणाले, ‘सदाशिवराव भाऊ पेशवे यांनी दिल्ली काबीज केल्यानंतर अनेक मराठी जनांनी दिल्लीत वास्तव्य केले. त्यांना रोड मराठा असे संबोधले जाते. त्यांच्या पुढील पिढीतील घरांमध्ये आजही राजमाता जिजाऊ आणि छत्रपती शिवाजी महाराज यांचे छायाचित्र पाहायला मिळते. सध्या माझे वास्तव बराच काळ दिल्लीत असल्याने संमेलनाच्या निमित्ताने येणारी मंडळी हे माझे सगेसोयरे, बांधव आहेत याचा आनंद आहे.’

मोरे, कसबे, डॉ. श्रीपाल सबनीस, जोशी आणि नहार यांनी मनोगत व्यक्त केले. मिलिंद कुलकर्णी यांनी सूत्रसंचालन केले. वंदना चव्हाण यांनी आभार मानले.

तुमचा निरोप मी देतो पुण्यातही सध्या मराठी बोलले जात नाही. हिंदीत बोला असा आग्रह उपनगरामंध्ये केला जातो. मराठी भाषा टिकवायची असेल, तर मराठी भाषा सक्तीची करावी, असा मुद्दा प्रेक्षकांमधून उपस्थित झाल्यानंतर ‘तुमचा निरोप मी उद्धव ठाकरे यांना देतो’, अशी मिश्कील टिप्पणी शरद पवार यांनी करताच सभागृहात हशा उसळला. ‘संमेलनात यशवंतराव चव्हाण यांच्या कार्यकर्तृत्वावर आणि इतिहासाचार्य राजवाडे यांच्या कार्यावर परिसंवाद ठेवावा’, अशी मागणी होताच ‘तुमचे म्हणणे साहित्य महामंडळापर्यंत पोहोचवतो’, असे पवार यांनी सांगितले.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: 98 akhil bharatiya marathi sahitya sammelan sharad pawar interaction with writers zws