पुणे : शेअर बाजारात गुंतवणुकीवर चांगला परतावा देण्याच्या आमिषाने व्यावसायिकाला ९९ लाख ७ हजार रुपयांचा गंडा घालण्याचा प्रकार उघडकीस आला आहे. प्रलोभनाला बळी पडून व्यावसायिकाने घराची विक्री करून आरोपीमार्फत शेअर बाजारात गुंतवणूक केल्याची माहिती पोलिसांनी दिली.

या प्रकरणी नितीन जगन्नाथ गोते (रा. भिवरी, ता. हवेली) याच्या विरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत खराडी भागातील ५१ वर्षीय व्यावसायिकाने चंदननगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. तक्रारदार व्यावसायिक आणि आरोपी नितीन गोते याची एका उपहारागृहात ओळख झाली होती. वर्षभरापूर्वी गोतेने व्यावसायिकाला शेअर बाजारात गुंतवणूक केल्यास दरमहा चांगला परतावा मिळेल, असे आमिष व्यावसायिकाला दाखविले होते. प्रलोभनाला बळी पडून व्यावसायिकाने राहत्या घराची विक्री करून गोते याला ९९ लाख ७ हजार रुपये दिले होते.
शेअर बाजारात नफा किंवा तोटा जरी झाला तरी दरमहा गुंतवणुकीवर दहा टक्के व्याजदराने परतावा देणार असल्याचे गोते याने व्यावसायिकाला सांगितले होते.

हेही वाचा – दहा हजार एकरवरील द्राक्षबागांना अवकाळीचा फटका; दर कोसळले, निर्यातीवर परिणाम; सोलापूर विभागात सर्वाधिक नुकसान

हेही वाचा – पुणे : कर्जमंजुरीच्या आमिषाने सायबर चोरट्यांचा दाम्पत्याला साडेनऊ लाखांचा गंडा

व्यावसायिकाने शेअर बाजारातील व्यवहारासंदर्भात उघडलेल्या बंँक खात्याची पाहणी केली. तेव्हा त्याला ९९ लाख ७ हजार रुपयांचा तोटा झाल्याचे आढळून आले. व्यावसायिकाने गोतेकडे विचारणा केली. तेव्हा त्याने उडवाउडवीची उत्तरे दिली. फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर व्यावसायिकाने पोलिसांकडे तक्रार दिली. पोलीस उपनिरीक्षक गोरक्ष घोडके तपास करत आहेत.

Story img Loader