पिंपरी- चिंचवड आरटीओ कडून पुणे- मुंबई द्रुतगती मार्गावर नियम तोडणाऱ्या वाहनचालकांना वाहतुकीचे धडे दिले जात आहेत. पुढील सहा महिने हा उपक्रम राबवला जाणार आहे. उर्से टोल नाका येथे एक समुपदेशन कक्ष उभारण्यात आला असून तिथं नियम तोडणाऱ्या वाहनचालकांची दहा प्रश्नांची ऑनलाइन परीक्षा घेतली जाते. अशी माहिती पिंपरी- चिंचवडचे आरटीओ इन्स्पेक्टर तानाजी धुमाळ यांनी दिली आहे.
पुणे- मुंबई द्रुतगती मार्ग देशातील प्रमुख मार्गापैकी एक आहे. पण, रस्ते, सुरक्षा नियमांचे पालन काटेकोर पणे होत नसल्याने अनेक अपघात द्रुतगती मार्गावर होतात. काही महिन्यांपूर्वी शिवसंग्राम चे नेते विनायक मेटे यांचं देखील पुणे- मुंबई द्रुतगती मार्गावर अपघात होऊन मृत्यू झाला होता. तर, याअगोदर काही अभिनेत्यांना सुद्धा आपला जीव महामार्गावर गमवावा लागलेला आहे. याचमुळं राज्यशासनाकडून पुणे- मुंबई द्रुतगती आणि जुना पुणे- मुंबई महामार्गावर रस्ते, सुरक्षेचे धडे दिले जात आहे.
हेही वाचा- पुणे: उधळपट्टीचा सायकल मार्ग ! सिंहगड रस्ता ते हडपसर नवीन मार्ग प्रस्तावित; ६६ कोटींचा खर्च अपेक्षित
उर्से टोल नाका येथे नियम तोडणाऱ्या वाहनचालकाला बाजूला घेऊन आरटीओचे अधिकारी, कर्मचारी समुपदेशन कक्षात घेऊन जातात. तिथं, रस्ते सुरक्षेचे महत्व पटवून दिले जातात. लेन कटिंग, ओव्हर स्पीड, शीट बेल्ट याविषयी माहिती दिली जाते. मग, त्यांची मोबाईलवरून ऑनलाइन परीक्षा घेतली जाते. दहा प्रश्नांच्या परीक्षेत रस्ते, सुरक्षेचे प्रश्न विचारले जातात. दहा पैकी अनेकांना चार ते आठ गुण मिळतात. वाहनचलकांना प्रमाणपत्र देऊन त्यांचा सन्मान केला जातो. नियम पाळण्यासाठी प्रोत्साहन मिळावं म्हणून आरटीओकडुन रस्ता सुरक्षा नियम पाळण्याची शपथ दिली जाते.