पुणे : अपघातात ५० वर्षीय पुरुष गंभीर जखमी झाला. उजवी मांडी आणि पायाच्या हाडांचा चुरा झाला. मोठी जखम झाल्याने हाडांचे तुकडेही बाहेर पडले होते. अशा रुग्णाला गुंतागुंतीच्या शस्त्रक्रियेद्वारे पुन्हा त्याच्या पायावर उभे करण्याचे काम डॉक्टरांनी केले आहे.या रुग्णाचा रस्त्यावर गंभीर अपघात झाला होता. त्याच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली होती. याच वेळी उजवी मांडी आणि पायातील हाडांचा चुरा झालेला होता. पायाला मोठी जखम झाल्याने हाडांचे अनेक तुकडे बाहेर पडले होते. या रुग्णाला तातडीने खराडीतील मणिपाल रुग्णालयात दाखल करण्यात आले. तेथील डॉक्टरांनी रुग्णाची स्थिती पाहून त्याच्यावर तातडीची शस्त्रक्रिया करण्याचा निर्णय घेतला. संसर्ग रोखून पायाची तुटलेली हाडे व्यवस्थित बसविण्यासाठी तातडीची शस्त्रक्रिया करण्यात आली.
शस्त्रक्रियेनंतर रुग्णाला अतिदक्षता विभागात ठेवण्यात आले. तिथे त्याच्यावर काही दिवस उपचार केल्यानंतर रुग्णाची स्थिती सुधारली. त्यानंतर त्याच्या पायाची हाडे पूर्ववत करण्यासाठी शस्त्रक्रिया करण्याचा निर्णय डॉक्टरांनी घेतला. मांडी आणि पायाचे हाड पूर्ववत करण्यासाठी कंबर आणि पायाच्या दुसऱ्या हाडाचा काही भाग डॉक्टरांनी काढला. त्यांचा वापर करून मांडी व पायाच्या हाडाला पूर्वीचा आकार देण्यात आला. त्यांना प्लेट आणि स्कूच्या साहाय्याने एकत्र जोडण्यात आले. त्यातून त्या रुग्णाच्या पायाची हाडे पूर्ववत आकारात आली. ही शस्त्रक्रिया डॉ. निखिल पानसरे आणि त्यांच्या पथकाने केली.
हेही वाचा >>>टोमॅटोचे दर आणखी वाढणार; महाराष्ट्र, कर्नाटक, आंध्र प्रदेशातून खरेदीचा केंद्र सरकारचा निर्णय
सहा तास शस्त्रक्रिया
याबाबत डॉ. निखिल पानसरे म्हणाले, की ही शस्त्रक्रिया सहा तास चालली. हाडांचा चुरा झाल्याने आणि हाडांचे काही तुकडे नसल्याने शस्त्रक्रिया आव्हानात्मक होती. हाडे जोडणे एवढाच आमचा उद्देश नव्हता तर त्यांना पूर्वीचा आकार देण्याचा हेतू होता. ही शस्त्रक्रिया यशस्वीपणे पार पडली आणि काही दिवसांतच रुग्णाला घरी सोडण्यात आले.