पुणे : पुण्यातील कोथरूड येथील चांदणी चौकात ६० फूट उंच स्वराज्यनिर्मिती शिल्पामधील छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा उभारण्याचा प्रस्ताव महापालिकेच्या शहर सुधारणा समितीच्या बैठकीत मान्य करण्यात आला. यापूर्वी या चौकात २० फूट उंच पुतळा उभारण्याचा प्रस्ताव महापालिकेने मान्य केला होता. त्यामध्ये बदल करून चौकात आता ६० फूट उंचीचा पूर्णाकृती पुतळा उभारला जाणार आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

चांदणी चौकात स्वराज्यनिर्मिती शिल्प उभारण्यासाठीचा प्रस्ताव महापालिकेचे तत्कालीन महापौर मुरलीधर मोहोळ यांनी दिला होता. महापालिकेने यापूर्वी तयार केलेल्या आराखड्यानुसार शिल्पामध्ये १७ फूट उंचीच्या चबुतऱ्यावर छत्रपती शिवाजी महाराजांचा ब्राँझ धातूमधील २० फूट उंचीचा पूर्णाकृती पुतळा उभारण्यात येणार होता. त्यासाठी अंदाजे २ हजार ४५० किलो धातूचा वापर केला जाणार होता. मोहोळ यांनी केंद्रीय राज्यमंत्री म्हणून पदभार स्वीकारल्यानंतर मोहोळ यांच्यासह शहरातील शिवप्रेमी नागरिक संघटनांनी प्रस्तावित पुतळ्याची उंची ६० फूट करावी, शिल्प परिसरात ४५ मीटर उंचीचा झेंडा दगडाच्या भिंती व फुलझाडे उभारून परिसर सुशोभित करावा, अशी मागणी केली होती.

यासाठी याचा सुधारित आराखडा तयार करण्यात आला आहे. पूर्वीच्या आराखड्यानुसार या शिल्पासाठी ७८ लाख ४० हजार रुपये खर्च अपेक्षित होता. आता त्यासाठी सात कोटी ६० लाख ३२ हजार रुपये खर्च अपेक्षित आहे. त्यास शहर सुधारणा समितीच्या बैठकीत मान्यता देण्यात आली. आता हा प्रस्ताव अंतिम मान्यतेसाठी सर्वसाधारण सभेत जाणार आहे. चांदणी चौकात उभारण्यात आलेल्या उड्डाणपुलाच्या परिसरात वारजेकडे जाणारा रस्ता व मुळशीकडून कोथरूडकडे जाणारा उड्डाणपूल आणि साताऱ्याकडून मुंबईकडे जाणाऱ्या मार्गाच्या सेवा रस्त्यामध्ये उपलब्ध असलेल्या साडेपाच हजार चौरस मीटर जागेत हे शिल्प साकारले जाणार आहे.