पुणे : बावधन परिसरातील एका इमारतीमध्ये असलेल्या फोटो स्टुडिओला रविवारी सायंकाळी आग लागल्याची घटना घडली. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या ५ गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या. शर्थीच्या प्रयत्नांनंतर आग आटोक्यात आणण्यात जवानांना यश आले. या आगीत स्टुडिओतील साहित्य जळून खाक झाले आहे.
सायंकाळी पावणेसहाच्या सुमारास बावधनमधील शिंदेनगर येथे एका दुकानामध्ये आग लागल्याची माहिती अग्निशमन दलाला मिळाली. त्याक्षणी कोथरुड, वारजे, पाषाण, औंध, एरंडवणा अग्निशमन केंद्रातून घटनास्थळी पाच गाड्या रवाना करण्यात आल्या. पाच मजली इमारत असून त्यातील एका फोटो स्टुडिओला आग लागून मोठ्या प्रमाणात धुर बाहेर येत होता.
हेही वाचा – पुणे : अटकेची भीती दाखवून ज्येष्ठाची फसवणूक, सायबर चोरट्यांविरुद्ध गुन्हा
हेही वाचा – पुणे : काकडी, फ्लॉवर, वांगी, गाजर स्वस्त
स्टुडिओमध्ये फ्लेक्स, फोटो फ्रेम आणि इतर साहित्य होते. रौद्र रूप धारण केलेल्या या आगीत स्टुडिओमधील हे साहित्य जळून खाक झाले. तर, तेथील तीन सदनिकांना आगीची झळ बसून नुकसान झाले आहे. इमारतीत धुरामध्ये अडकलेल्या सात नागरिकांना अग्निशमन दलाच्या जवानांनी बाहेर काढले. त्यांना प्राथमिक उपचाराकरिता रुग्णालयात रवाना केले आहे. जवानांनी चारही बाजूने आगीवर पाण्याचा मारा करून काही वेळात आगीवर नियंत्रण मिळविले. दरम्यान, आगीचे नेमके कारण समजू शकले नाही.