पुणे : गेल्या आर्थिक वर्षात नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी ३४ औषध उत्पादक कंपन्यांचा परवाना निलंबित करण्यासह एका कंपनीचा परवाना रद्द करण्याची कारवाई अन्न व औषध प्रशासनाने केली. याचबरोबर २२ घाऊक औषध विक्रेते आणि ६७ किरकोळ औषध विक्रेत्यांचे परवाने रद्द करण्यात आले.

अन्न व औषध प्रशासनाच्या पुणे विभागाने एप्रिल २०२४ ते मार्च २०२५ या कालावधीत ही कारवाई केली आहे, असे विभागातर्फे सांगण्यात आले. पुणे विभागात पुण्यासह सांगली, सातारा, कोल्हापूर, सोलापूरचा समावेश आहे. पुणे विभागाने केलेल्या तपासणीत अनेक कंपन्यांमध्ये निकषानुसार पात्र कर्मचारी काम करताना आढळले नाहीत, औषधांची निर्मिती प्रक्रिया योग्यपणे होत नव्हती आणि यंत्रेही अद्ययावत केलेली नव्हती, अशा प्रकारचे उल्लंघन आढळून आले. या प्रकरणी एका कंपनीचा परवाना रद्द करण्यात आला, तर ३० कंपन्यांचे परवाने निलंबित करण्यात आले. याचबरोबर ४ आयुर्वेदिक कंपन्यांचा परवाना निलंबित करण्यात आला आहे.

गेल्या वर्षभरात प्रशासनाने ५०९ घाऊक विक्रेत्यांची तपासणी केली. त्यात २२ विक्रेत्यांचे परवाने रद्द करण्यात आले, तर ५६ जणांचे परवाने निलंबित करण्यात आले. याचबरोबर २,०३० किरकोळ औषध विक्रेत्यांची तपासणी करण्यात आली. त्यात ६७ विक्रेत्यांचे परवाने निलंबित, तर ४३२ जणांचे परवाने निलंबित करण्यात आले. या विक्रेत्यांनी प्रामुख्याने विनादेयक औषध विक्री, औषध विक्रीसाठी पात्र व्यक्ती न नेमणे, डॉक्टरांच्या चिठ्ठीशिवाय औषधे देणे आदी नियमांचा भंग केल्याचे आढळून आले.

अन्न व औषध प्रशासनाने गेल्या वर्षभरात १,२०७ सौंदर्य प्रसाधनांचे नमुने जप्त करून त्यांची तपासणी केली. याचबरोबर २७ ठिकाणी छापा मारून ४८.६३ लाख रुपयांचा माल जप्त केला. औषधाच्या जाहिरातीत खोटा दावा केल्याप्रकरणी एका कंपनीवर खटला दाखल करण्यात आला आहे. याचबरोबर प्रशासनाने गेल्या वर्षभरात ३९ जणांविरोधात न्यायालयात खटले दाखल केले. त्यातील ७ जणांना शिक्षा झाली असून, २ जण निर्दोष सुटले आहेत.

रक्तपेढ्यांवरही कारवाई

पुणे विभागात २०५ रक्तपेढ्या आहेत. या रक्तपेढ्यांची अन्न व औषध प्रशासनाच्या पथकाने एकूण २३४ वेळा तपासणी केली. त्यात ३ रक्तपेढ्यांचे परवाने रद्द करण्यात आले, तर ४८ रक्तपेढ्यांचे परवाने निलंबित करण्यात आले. रक्त घेण्यासाठी पात्र व्यक्ती नसणे, रक्त तपासणीची सुविधा नसणे, परराज्यात परवानगीविना रक्त पाठविणे, रक्तदान शिबिरावेळी दात्यांना भेटवस्तू देणे, अशा प्रकारच्या नियमांचे उल्लंघन या रक्तपेढ्यांनी केले होते.

अन्न व औषध प्रशासन विभागाची कारवाई

प्रकार – एकूण संख्या – एकूण तपासणी – परवाना रद्द – परवाना निलंबन

ॲलोपॅथी कंपन्या – १६७ – १७२ – १ – ३०

आयुर्वेदिक कंपन्या – ११९ -११२ – ० – ४

घाऊक औषध विक्रेते – ७,२७० – ५०९ – २२ – ५६

किरकोळ औषध विक्रेते – २८,०८६ – २,०२० – ६७ – ४३२

रक्तपेढ्या – २०५ – २३४ – ३ – ४८

अन्न व औषध प्रशासनाच्या पुणे विभागाने नियमांचे उल्लंघन करणारे औषध उत्पादक आणि विक्रेत्यांचा परवाना रद्द करणे अथवा निलंबन करण्याचे पाऊल उचलले. यातील ७० टक्के कारवाई पुण्यात झालेली आहे. परवाना निलंबन जास्तीत जास्त २ महिन्यांसाठी केले जाते. परवाना रद्द झाल्यास अन्न व औषध प्रशासन विभागाच्या मंत्र्यांसमोर या निर्णयाला आव्हान द्यावे लागते. – गिरीश हुकरे, सहआयुक्त, अन्न व औषध प्रशासन विभाग