बहिणीला घरी आणण्यासाठी निघालेल्या भावाचा अपघातात दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना तळेगाव येथे गुरुवारी संध्याकाळी साडेसातच्या सुमारास घडली आहे. प्रतीक विजय ढोरे असं अपघातात मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे. प्रतीक बहिण प्रणितीला संध्याकाळच्या वेळी घेण्यासाठी निघाला होता. कंटेनरने दिलेल्या धडकेत गंभीर जखमी होऊन उपचारापूर्वी त्याचा मृत्यू झाला. चाकण तळेगाव रोडवर हा अपघात झाला. प्रतीक विना हेल्मेट दुचाकी चालवत असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मयत प्रतीक विजय ढोरे कामावरून आलेल्या बहिणीला आणण्यासाठी तळेगाव रेल्वे स्थानकाच्या दिशेने दुचाकीवरून जात होता. त्याच वेळी कंटेनरने प्रतीकच्या दुचाकीला समोरून धडक दिली. अपघात झाल्यानंतर प्रतीक रक्ताच्या थारोळ्यात पडला होता. त्याला नागरिकांनी तातडीने रुग्णालयात नेले. परंतु उपचारापुर्वीच मृत्यु झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले.

या घटनेमुळे ढोरे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. प्रतीकने दुचाकी चालवत असताना हेल्मेट घातले नव्हते, अशी माहिती तळेगाव पोलिसांनी दिली आहे. कदाचित त्याने हेल्मेट घातले असते तर तो वाचला असता. प्रतीक १२ वीत शिकत होता. अपघात झाल्यानंतर कंटेनर चालक फरार झाला असून त्याचा शोध तळेगाव पोलीस घेत आहेत.

Story img Loader