शिवाजीनगर जिल्हा सत्र न्यायालयात दाखल असलेल्या खटल्यात मदत करण्यासाठी एकाकडून दीड लाखांची लाच घेणाऱ्या लिपिकाला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) पकडले. शिवाजीनगर न्यायालयाच्या प्रवेशद्वारासमोर ही कारवाई करण्यात आली.सचिन अशाेक देठे (वय ३९, राजगुरूनगर, जि. पुणे) असे अटक करण्यात आलेल्या लिपिकाचे नाव आहे. या प्रकरणी देठे यांच्या विरोधात भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियमान्वये शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत एकाने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दिली हाेती. देठे जिल्हा न्यायालयात वरिष्ठ लिपिक आहे.
तक्रारदारच्या मावसभावाच्या विरोधात दाखल खटल्यात निर्दोष मुक्तता करण्यासाठी मदत करताे, असे देठे याने तक्रारदाराला सांगितले होते. त्यानंतर तक्रारदाराकडे दोन लाख रुपयांची लाच मागितली होती. तडजोडीत तक्रारदाराने दीड लाख रुपयांची लाच देण्याचे मान्य करुन तक्रार नोंदविली. त्यानंतर गुरुवारी (१ डिसेंबर) रात्री शिवाजीनगर न्यायालयाच्या परिसरात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा लावला. तक्रारदाराकडून दीड लाख रुपयांची लाच स्वीकारताना देठेला पकडले.लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस अधीक्षक अमोल तांबे, अतिरिक्त अधीक्षक सूरज गुरव यांच्या मार्गदर्शाखाली सहायक आयुक्त श्रीहरी पाटील, पोलीस निरीक्षक ज्योती पाटील तपास करत आहेत.