पिंपरी- चिंचवड शहरातील रुपीनगर परिसरात कपड्याच्या दुकानात खरेदीसाठी आलेल्या तरुणांना चप्पल बाहेर काढण्यास सांगितल्याचा राग मनात धरून दुकानदारावर कोयत्याने हल्ला केल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी चिखली पोलिसांनी पाच सराईत गुन्हेगारांना अटक केली. सर्व आरोपी हे गुन्हेगारी पार्श्वभूमीचे आहेत. आरोपींची पोलिसांनी दहशत माजवलेल्या परिसरातून धिंड काढली आहे. राजेंद्रसिंग राठोड यांनी घटनेबाबत चिखली पोलिसात तक्रार दिली.
पिंपरी- चिंचवडमधील रूपीनगर येथील गायत्री गारमेंट कपड्याच्या दुकानात आरोपी हे कपडे खरेदी करण्यासाठी चप्पलसह दुकानात गेले. चप्पल चिखलाने माखलेली असल्याने दुकानदाराने चप्पल बाहेर काढण्यास सांगितली. याचाच राग मनात धरून पाच सराईत गुन्हेगारांनी दुकानाची दगडाने तोडफोड करत दुकानातील कामगार आणि व्यावसायिकावर कोयत्याने हल्ला केल्याचं समोर आल आहे. हा सर्व प्रकार सीसीटीव्हीत कैद झाला आहे. दरम्यान, पळून जात असताना या पाचही आरोपींनी रस्त्यालगत पार्क केलेल्या आठ वाहनांची धारदार शस्त्राने तोडफोड केली आहे. दहशत पसरवत आरडाओरडा करत परिसरात भीतीच वातावरण निर्माण केलं. याप्रकरणी अवघ्या काही तासातच चिखली पोलिसांनी पाच जणांना अटक केली असून त्यांची धिंड काढण्यात आली आहे. वरिष्ठ पोलिस निरीक्षक काटकर यांच्या मार्गदर्शनाखाली ही कामगिरी करण्यात आली.