पिंपरी : समाजमाध्यमातील इन्स्ट्राग्रामवर इन्फोसिसचे संस्थापक नारायण मूर्ती यांचा कॉपिटलेक्स ट्रेडिंग प्लॅटफॉर्म संबंधित चित्रफितीचा वापर करुन वेगवेगळे ट्रेडिंग वापरून मोठा परतावा देण्याचे आमिष दाखवून व्यवसायिकाची दहा लाख रुपयांची फसवणूक केली. हा प्रकार पिंपळेसौदागर येथे उघडकीस आला.
याबाबत आप्पासाहेब भागवत भोईटे (वय ३९, रा.काटे वस्ती, पिंपळे सौदागर) यांनी सांगवी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी कॉपिटलेक्स ट्रेडिंग खात्यावरील गौरव व इतरांवर गुन्हा दाखल केला आहे.
हेही वाचा – पुण्यात अघोषित पाणीकपातीला सुरुवात : येत्या बुधवारी ‘या’ भागातील पाणी बंद
फिर्यादी भोईटे यांच्याशी गौरव व त्यांच्या इतर साथीदारांनी संपर्क साधला. त्यांच्या कॉपिटलेक्स ट्रेडिंग प्लॅटफॉर्मवरील ट्रेडिंग संबंधित इन्फोसिसचे संस्थापक नारायण मूर्ती यांची चित्रफीत पाठविली. त्यांचा विश्वास संपादन केला. त्यांची दिशाभूल करुन कॉपिटलेक्स ट्रेडिंग प्लॅटफॉर्मवर गुंतवणूक केल्यास मोठा परतावा देण्याचे आमिष दाखविले. फिर्यादी यांनी गुंतवणुकीची तयारी दर्शविली. त्यानुसार त्यांना वेगवेगळे ट्रेडिंग करण्यास सांगितले. फिर्यादी भोईटे यांनी वेळोवेळी दहा लाख ४ हजार रुपयांची गुंतवणूक केली. त्यानंतर त्यांना कोणताही परतावा न देता फसवणूक केल्याचे पोलिसांनी सांगितले.