पुणे : शिरूर लोकसभा मतदारसंघातील एका अपक्ष उमेदवाराने प्रचार खर्चाच्या तीन टप्प्यातील तपासणीदरम्यान अनुपस्थिती लावली. संबंधित उमेदवाराने खर्चाची माहिती लपविल्याने गुन्हा दाखल करण्याचे आदेश शिरूर लोकसभा मतदारसंघाचे निवडणूक निर्णय अधिकारी अजय मोरे यांनी दिले.
शिरूर लोकसभा मतदारसंघासाठी चौथ्या टप्प्यात सोमवारी (१३ मे) मतदान होत आहे. या मतदारसंघात ३२ उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. या उमेदवारांनी उमेदवारी अर्ज दाखल केल्यापासून दैनंदीन प्रचार खर्चाचा तपशील नोंदवून निवडणूक खर्च व्यवस्थापन विभागाला देणे बंधनकारक आहे. त्यानुसार निवडणूक खर्च निरीक्षकांच्या देखरेखेखाली सर्व उमेदवारांच्या खर्चाची तीन टप्प्यात तपासणी करण्यात आली. मात्र अपक्ष उमेदवार अमोल पाचुंदकर यांनी एकाही तपासणीला उपस्थिती लावली नसून त्यांना निवडणूक निर्णय अधिकारी मोरे यांनी तीनदा नोटीस बजावली. या नोटीसला देखील कुठलेच उत्तर दिले नाही. त्यामुळे शिरूर लोकसभा मतदारसंघाचे सहाय्यक निवडणूक अधिकारी यांना पत्र पाठवून पाचुंदकर यांच्यावर गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले आहेत, अशी माहिती मोरे यांनी दिली.